भाजप गटनेत्यास घेराव : सात नगरसेवकांसह 40 जणांवर फाैजदारी, सुरक्षारक्षकांवरही होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 09:06 AM2021-03-16T09:06:33+5:302021-03-16T09:07:29+5:30
शिवसेनेच्या नगरसेविका राधिका फाटक, मीनल संख्ये, साधना जोशी, नगरसेवक दिलीप बारटक्के, विकास रेपाळे, सिद्धार्थ ओवळेकर, राजू फाटक यांच्यासह ४० पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ठाणे : भाजप गटनेते मनोहर डुंबरे यांच्या दालनात घुसून त्यांना घेराव घालणाऱ्या शिवसेनेच्या सात नगरसेवकांसह सुमारे ४० पदाधिकाऱ्यांवर बेकायदा जमाव जमवून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची पायमल्ली करणे, मास्क न लावणे यांसारख्या कलमांखाली ठाणेपोलिसांनी सोमवारी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. कर्तव्यात कसूर केलेल्या सुरक्षा रक्षकांवरही पालिका प्रशासनाकडून कारवाई केली जाणार आहे. डुंबरे यांनी शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्यामुळे संतप्त नगरसेवकांनी त्यांना घेराव घातला होता. या घटनेची दखल घेऊन कारवाईची मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली होती.
शिवसेनेच्या नगरसेविका राधिका फाटक, मीनल संख्ये, साधना जोशी, नगरसेवक दिलीप बारटक्के, विकास रेपाळे, सिद्धार्थ ओवळेकर, राजू फाटक यांच्यासह ४० पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ठाणे शहरात अनावश्यक तीन पादचारी पूल उभारून १३ कोटी रुपयांची लूट केली जात असल्याचा आरोप डुंबरे यांनी केला होता व या माध्यमातून शिवसेना निवडणूक निधी जमा करीत असल्याचा दावा डुंबरे यांनी केला होता. डुंबरे यांच्या या आरोपांमुळे नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली १००-१५० कार्यकर्ते डुंबरे यांच्या केबिनमध्ये घुसले. त्यांनी डुंबरे यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. आठ दिवसांत माफी मागण्याची धमकी दिली. कोरोना काळात गर्दी जमवून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले. घेराव घालून घोषणाबाजी करताना नगरसेवक व पदाधिकारी यांनी मास्क परिधान केले नव्हते. हेही कोरोना नियमांचे उल्लंघन असल्याने त्याकरिताही गुन्हा दाखल झाला आहे. घेराव घालताना नियम पायदळी तुडविणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा भाजपकडून निषेध आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला होता.
यासंदर्भात पोलीस आयुक्तांना भाजपने निवेदन दिले होते. त्यानंतर सोमवारी कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या सात नगरसेवकांसह ४० पदाधिकाऱ्यांवर नाैपाडा पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
जबाबदार सुरक्षारक्षकांची मागवली माहिती
भाजप गटनेते मनोहर डुंबरे यांच्या केबिनमध्ये इतक्या मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा होण्यापूर्वी त्यांना रोखण्यात अपयशी ठरलेल्या महापालिका मुख्यालयातील सुरक्षा रक्षकांवरही कारवाई करावी, अशी मागणी भाजपने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
कर्तव्यात कसूर करणाऱ्या सुरक्षा रक्षकांवर कारवाई प्रस्तावित आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांकडून त्या दिवशी मुख्यालयात सुरक्षा व्यवस्थेवर असलेल्या व डुंबरे यांच्या दालनात शिवसेनेच्या मंडळींनी घुसू नये ही जबाबदारी असलेल्या सुरक्षा रक्षकांची माहिती मागविली आहे.
ज्या दिवशी डुंबरे यांना घेराव घालण्यात आला होता, त्यादिवशीचे सीसीटीव्ही फुटेज तपासून सुरक्षा रक्षकांवर कारवाई केली जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.