भाजपामुळे अवघ्या तीन वर्षांतच आणीबाणीची वेळ आली- राजेंद्र देवळेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2017 06:46 PM2017-09-24T18:46:06+5:302017-09-24T18:47:13+5:30
देशात आणीबाणी लागू करण्यासारखी परिस्थिती आणण्यासाठी काँग्रेसला 25 वर्षे लागली. मात्र आताच्या भाजप सरकारने अवघ्या तीन वर्षांत ती परिस्थिती निर्माण केल्याचे मत केडीएमसी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी व्यक्त केले. राष्ट्रसेवा दल कल्याण-डोंबिवली यांच्यातर्फे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सध्यस्थिती या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
कल्याण, दि. 24 - देशात आणीबाणी लागू करण्यासारखी परिस्थिती आणण्यासाठी काँग्रेसला 25 वर्षे लागली. मात्र आताच्या भाजप सरकारने अवघ्या तीन वर्षांत ती परिस्थिती निर्माण केल्याचे मत केडीएमसी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी व्यक्त केले. राष्ट्रसेवा दल कल्याण-डोंबिवली यांच्यातर्फे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सध्यस्थिती या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच समाजकार्य आणि पत्रकारितेची 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार अण्णा बेटावदकर यांचा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी देवळेकर बोलत होते.
सार्वजनिक वाचनालयात आज हा कार्यक्रम पार पडला. बेटावदकर यांना 33 हजारांची रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकत्र्या इंदवी तुळपुळे, सामाजिक राजकीय कार्यकर्ते प्रमोद हिंदुराव, ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते संजीव साने , ज्येष्ठ पत्रकार बेटावदकर आणि त्यांच्या पत्नी प्रभा बेटावदकर , अश्विनी सातव-ढोके , राष्ट्रसेवा दलाचे सुहास कोते आदी मान्यवर उपस्थित होते.
देवळेकर म्हणाले, आम्ही त्यांच्याबरोबर सत्तेत असलो तरीही आमची बांधिलकी जनतेशी आहे. जनतेला भेडसावणा-या प्रत्येक समस्येत आम्ही त्यांच्यासोबत आहोत. या देशात कोणत्याही राजवट आली तरी सामाजिक चळवळ जिवंत आहे, तोपर्यंत समाजाने घाबरण्याची गरज नाही. आपण आपला आवाज बुलंद करायला हवा. आपला आवाज बुलंद केल्यास देशाच्या स्वातंत्र्याला धोका निर्माण होणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.
इंदवी तुळपुळे म्हणाले, सुरूवातीला आम्ही आदिवासी पाडय़ात जायचो तेव्हा तेथील लोक कोणत्याही प्रश्नाला उत्तर देत नसे. समाजाला व्यक्त होण्याची सवय व्हायला हवी आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यात तुम्ही -आम्ही आपला विशिष्ट विचार मांडले पाहिजेत. विचार करायचा आणि मांडायला स्वातंत्र्य आपल्याकडे नाही. या गोष्टीची मूळं कुठे आहेत हे शोधायची गरज आहे. सत्य बोला पण आवडणारे बोला. पण न आवडणारे असे खरे मात्र बोलू नका असे कुणी करते तेव्हा ते आवडत नाही. अप्रिय बोलून केलेले आक्रमण होते. त्यात ज्यांच्यावर आक्रमण होते. त्यांना त्यांचे उत्तर द्यावे लागते. विचार करायचं की नाही. प्रश्न विचारायचं की नाही या संस्कृतीत लहानपणापासून आपण वाढलो असतो. त्यांने आज हे टोक गाठले आहे. कोणती ही लहान मूल म्हणून कसे व्यक्त व्हावे हे आपल्या जीवनशैलीत दिसत नाही. मूलभूत गोची अशी आहे की, अभिव्यक्ती ही विचारांतून आली पाहिजे. विचारांचे स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य एकापाठोपाठ हातात हात धरून आले पाहिजे. आज सत्तेत असल्याने काहीही बोलले तरी आपण ते खपवून घेत आहे. विवेकवादी चिकित्सा करीत नाही, कोणाच्या भावना दुखत आहे का हे पण आपण पाहत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य पैश्यांचे बळ ज्यांच्या मागे आहे ते काहीही बोलले तरी चालते. आपले पुढारी बोलतात की गणपतीला हत्तीचे मुख लावले तर त्याकाळात अवयव प्रत्यारोपणाचे तंत्र अवगत होते. आदिवासी पाडय़ातील एका शाळेत न जाणा-या मुलांनी प्रश्न विचारले मळापासून गणपती बनविला तर किती दिवस आंघोळ केली नसेल. हे भयंकर बाहेर आले तर किती भयंकर परिस्थिती होईल. साधेसाधे प्रश्न माणसाला पडतात ते विचारण्याची सोय, संधी आणि परंपरा पुन्हा आणण्याची गरज आहे. आपला विचार पटला नाहीतर वाद घालू पण डोकी फोडणार नाही यासारखे काम करायला आमच्यासारख्या संघटना कमी पडल्या. प्रत्येकाने सहिष्णु असावे. मतभेद राहणार आहेत. पुढच्या समाज वेगळ्य़ा पध्दतीने घडावा अश्या पध्दतीने अभिव्यकती स्वातंत्र्याचा विचार व्हावा, असे ही त्यांनी सांगितले.