कल्याण तालुक्यात ११ ठिकाणी भाजप बहुमतात, महाविकास आघाडीची ९ ठिकाणी बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 09:24 AM2021-01-19T09:24:52+5:302021-01-19T09:25:48+5:30
टिटवाळा : कल्याण तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींमधील १६४ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी वरप ग्रामपंचायत बिनविरोध झाली. त्यामुळे ...
टिटवाळा : कल्याण तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींमधील १६४ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी वरप ग्रामपंचायत बिनविरोध झाली. त्यामुळे २० ग्रामपंचायतींसाठी १५ तारखेला मतदान झाले होते. कल्याणमधील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात सोमवारी सकाळी मतमोजणी पार पडली. बहुतांश ठिकाणी शिवसेना-राष्ट्रवादी - काँग्रेसने महाआघाडी पुरस्कृत उमेदवारांची थेट भाजप पुरस्कृत उमेदवारांबरोबर लढत होती.
अत्यंत चुरशीच्या या लढतीत २० पैकी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवारांनी नऊ ठिकाणी, तर भाजप पुरस्कृत उमेदवारांनी ११ ग्रामपंचायतींमध्ये बहुमत मिळवले. खोणी ग्रामपंचायतीमध्ये मनसेने खाते उघडले आहे. तेथे मनसे पुरस्कृत चार उमेदवार निवडून आले आहेत. नडगाव-दानबाव ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या पॅनलचा पराभव झाला आहे. तेथे अपक्ष उमेदवार शेखर लोणे व प्रमिला लोणे हे विजयी झाले आहेत.
घोटसईमधील नऊच्या नऊ जागांवर भाजपने वर्चस्व मिळविले आहे. रायते आठ पैकी सेना आठ, भाजप एक, तर गोवेली-रेवतीमध्ये नऊपैकी सेना पाच, भाजपचे चार उमेदवार निवडून आले आहेत. राया-ओझर्लीमध्ये नऊपैकी शिवसेना-भाजप व इतरांना पाच तर राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या. चिंचवली-उतणेमध्ये नऊच्या नऊ उमेदवार ग्रामविकास पॅनलचे विजयी झाले आहेत. बेहरे ग्रामपंचायतीत १७ पैकी सेना-राष्ट्रवादी १३, भाजप चार, गुरवलीत ग्रामविकास पॅनल पाच, अपक्ष चार, म्हस्कळ ग्रामविकास पॅनल प्रकाश भोईर पुरस्कृत पाच, भाजप दोन, सेना एक, इतर एक अशा प्रकारे उमेदवार विजयी झाले आहेत.
दरम्यान, मतमोजणीसाठी चोख पोलीस बंदोबस्त असल्याने मतमोजणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. ही विजयी उमेदवारांची आकडेवारी असली तरी सरपंचपदाचे आरक्षण पडल्यावरच तालुक्यातील किती ग्रामपंचायती कोणत्या पक्षाच्या ताब्यात हे चित्र स्पष्ट होणार आहे.
म्हारळमध्ये ओमी टीमची भूमिका निर्णायक -
कल्याण तालुक्यातील म्हारळ ग्रामपंचायतीत १७ जागांपैकी महाविकास आघाडी सात तर भाजप सात जागांवर निवडून आली आहे. तर, तीन जागांवर टीम ओमी कलानीचे उमेदवार निवडून आले आहेत. टीम ओमी उल्हासनगर मनपात शिवसेनेसोबत सत्तेत आहे. त्यामुळे येथे टीम ओमी कलानीची भूमिका निर्णायक ठरणार आहे.