लसीकरणाच्या ग्लोबल टेंडरवर आक्षेप घेणाऱ्या भाजपला सुनावले खडे बोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:43 AM2021-05-20T04:43:55+5:302021-05-20T04:43:55+5:30

ठाणे : आर्थिक परिस्थिती नसतानाही ठाणे महानगरपालिकेने कोरोना लसींसाठी ग्लोबल टेंडर काढण्याची तयारी केली आहे; परंतु त्यासाठी निधी ...

BJP has objected to the global tender for vaccination | लसीकरणाच्या ग्लोबल टेंडरवर आक्षेप घेणाऱ्या भाजपला सुनावले खडे बोल

लसीकरणाच्या ग्लोबल टेंडरवर आक्षेप घेणाऱ्या भाजपला सुनावले खडे बोल

Next

ठाणे : आर्थिक परिस्थिती नसतानाही ठाणे महानगरपालिकेने कोरोना लसींसाठी ग्लोबल टेंडर काढण्याची तयारी केली आहे; परंतु त्यासाठी निधी कसा उभा करणार, असा प्रश्न करत भाजपने लसीकरणावर आक्षेप घेतला होता. बुधवारी महासभेत भाजपच्या या भूमिकेवरून महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी खडे बोल सुनावले. केंद्राकडून लसींचा पुरवठा होत नसल्याने नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच हा निर्णय घेतला असताना त्याचे स्वागत करण्याऐवजी भाजपकडून विरोध केला जातो. यावर महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित करीत भाजपच्या नगरसेवकांना कोंडीत पकडले.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर महापालिकेने ५ लाख लसींसाठी ग्लोबल टेंडर काढण्याचे निश्चित केले; परंतु यावरून भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी महापालिका यासाठी निधी कसा उभारणार, असा सवाल केला. सर्व महापालिकांसाठी ग्लोबल टेंडर काढले जाईल, असे राज्य शासनाने स्पष्ट केले असतानाही महापालिकेने कशासाठी टेंडर काढावे, असाही सवाल त्यांनी केला होता. बुधवारी महासभेतदेखील भाजपच्या नगरसेवकांनी लसीकरणासाठी निधी कसा उभा करणार असा सवाल केला. यावरून नारायण पवार, मिलिंद पाटणकर, कृष्णा पाटील आदींसह भाजपच्या इतर नगरसेवकांनीदेखील लसीकरणावरून मुद्दा उपस्थित केला.

या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी भाजपच्या नगरसेवकांना कोंडीत पकडत त्यांच्यावर पलटवार केला. केंद्राने वेळेवर लस पुरवठा न केल्यानेच महापालिकेवर लस विकत घेण्याची वेळ आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केला. त्यामुळे ठाणेकरांच्या हिताच्या दृष्टिकोनातून याला पाठिंबा द्यायचा, तर विरोध करून या मोहिमेला खीळ घालण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. भाजपने ही दुटप्पी भूमिका सोडावी. राजकारण बाजूला ठेवून या मोहिमेला सहकार्य करण्याऐवजी विरोध करणे अयोग्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महापौर नरेश म्हस्के यांनीदेखील या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी वेळप्रसंगी प्रभागातील कामे अर्धी करू. मात्र, या ग्लोबल टेंडरसाठी निधी उभा करू अशी भूमिका मांडली; परंतु राजकारण करून या मोहिमेला खीळ घालू नका, असेही त्यांनी सांगितले; परंतु केवळ मदतीच्या नावावर बिस्कीट वाटायचे आणि खुर्च्यांना स्वत:चे स्टीकर लावायचे ही भाजपची भूमिका अयोग्य असल्याची टीका त्यांनी केली. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून ग्लोबल टेंडरसाठी पाठिंबा द्यावा, असेही त्यांनी सांगितले. अखेर आमचा देखील या लसीकरणाला विरोध नाही. मात्र, केवळ निधी कसा उभा करणार एवढीच माहिती मिळावी म्हणूनच ही चर्चा केल्याचे भाजपच्या नगरसेवकांनी स्पष्ट केले.

चौकट - या महासभेत सध्या लसीकरण सुरू असलेल्या मोहिमेवरूनदेखील भाजपच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला होता. काही ठिकाणी जास्तीचा पुरवठा केला जात आहे, काही ठिकाणी ठरवून लस कमी दिल्या जात आहेत. त्यामुळे ही मोहीम योग्य पद्धतीने राबविण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या नगरसेवकांनी केली. त्यानुसार कुठेही दुजाभाव न करता लसीकरणाची मोहीम यशस्वीपणे सुरू असल्याची माहिती महापौरांनी दिली. नियमानुसारच शहरातील केंद्रे सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: BJP has objected to the global tender for vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.