धार्मिकस्थळांवरील कारवाईला भाजपाने केला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 03:54 AM2018-06-13T03:54:05+5:302018-06-13T03:54:05+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेने राज्य सरकारच्या निर्देशानुसार अनधिकृत धार्मिकस्थळे हटवण्याकरिता मीरा रोडच्या शांती पार्क व शांतीनगरातील १० ते १२ धार्मिकस्थळांना नोटिसा पाठवताच भाजपाच्या नगरसेवकांनी त्याला कडाडून विरोध करत आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
मीरा रोड - मीरा-भार्इंदर महापालिकेने राज्य सरकारच्या निर्देशानुसार अनधिकृत धार्मिकस्थळे हटवण्याकरिता मीरा रोडच्या शांती पार्क व शांतीनगरातील १० ते १२ धार्मिकस्थळांना नोटिसा पाठवताच भाजपाच्या नगरसेवकांनी त्याला कडाडून विरोध करत आत्मदहनाचा इशारा दिला आहे. ही धार्मिकस्थळे अनेक वर्षांपासून अस्तित्वात असून त्यांच्या विकासात अडसर नसल्याने नोटिसा त्वरित मागे घ्या, अशी मागणी सोमवारी बैठकीत करण्यात आली. भाजपा नगरसेवक प्रशांत दळवी व सुरेश खंडेलवाल यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
मीरा रोड येथील शांती पार्क व शांतीनगर परिसरातील १० ते १२ मंदिरांची नावे कारवाई करण्याच्या धार्मिकस्थळांच्या यादीत असल्याने अतिरिक्त आयुक्त माधव कुसेकर यांनी ७ जूनला सुनावणी घेतली होती. कुसेकर यांनी स्थानिकांना डावलून भाजपाखेरीज इतर पक्षांतील तक्रारदारांनाच पाचारण केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या एकतर्फी सुनावणीतून कारवाईचा निर्णय प्रशासनाने घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. शहरात धार्मिक तेढ निर्माण करणारी ही कारवाई असल्याचा आरोप करत स्थानिकांनी सत्ताधारी भाजपाच्या लोकप्रतिनिधींकडे धाव घेतली.
उपायुक्त (मुख्यालय) विजयकुमार म्हसाळ यांनी सोमवारी यासंदर्भात बैठकीचे आयोजन केले होते. त्यात स्थानिक रहिवाशांसह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, भाजपाचे उपमहापौर चंद्रकांत वैती, स्थायी सभापती ध्रुवकिशोर पाटील, महिला व बालकल्याण समितीचे उपसभापती सीमा शाह, नगरसेवक सुरेश खंडेलवाल, प्रशांत दळवी, मोहन म्हात्रे, अनिल विराणी, नगरसेविका हेतल परमार, माजी नगरसेविका डॉ. नयना वसाणी आदी उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्तांनी एकतर्फी सुनावणीतून घेतलेला कारवाईचा निर्णय त्वरित मागे घेऊन संबंधितांवर कारवाईची मागणी नगरसेवकांनी केली. आयुक्त बालाजी खतगावकर यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे म्हसाळ यांनी सांगितले.
२८ धार्मिकस्थळे हटवली
शहरातील ७८ धार्मिकस्थळांची नावे यादीत समाविष्ट असून त्यातील १७ धार्मिकस्थळांना नियमित करण्यात आले आहे. २८ धार्मिकस्थळे हटवण्यात आली असून ३३ धार्मिकस्थळांवर कारवाई करणे अद्याप बाकी आहे. त्यात शांती पार्क व शांतीनगर येथील मंदिरांचा समावेश आहे. आता धार्मिकस्थळांवरून मीरा-भाईंदरमध्ये राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात असल्याने भविष्यात यावर चर्चा होणार असे बोलले जात आहे.