मीरा-भाईंदरमध्ये आवाज भाजपाचाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:03 AM2019-03-11T00:03:38+5:302019-03-11T00:04:06+5:30

भाजपा-शिवसेना यांची वरिष्ठ पातळीवर युती झाली असली तरी मीरारोड व भाईंदर या दोन शहरात शिवसेनेला डिवचण्याची, त्यांना दूषणे देण्याची एकही संधी आ. नरेंद्र मेहता यांनी सोडलेली नाही.

The BJP has a voice in Meera-Bhayander | मीरा-भाईंदरमध्ये आवाज भाजपाचाच

मीरा-भाईंदरमध्ये आवाज भाजपाचाच

Next

- धीरज परब, मीरा-भाईंदर

भाजपा-शिवसेना यांची वरिष्ठ पातळीवर युती झाली असली तरी मीरारोड व भाईंदर या दोन शहरात शिवसेनेला डिवचण्याची, त्यांना दूषणे देण्याची एकही संधी आ. नरेंद्र मेहता यांनी सोडलेली नाही. महापालिकेतील बहुमताची सत्ता हेच त्याचे कारण असून या दोन शहरांत तरी आवाज भाजपाचाच चालणार, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

जपा व शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी एकमेकांची उणीदुणी काढण्यात कोणतीही कसर ठेवली नसली तरी लोकसभा व त्या पाठोपाठ होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत युती केली आहे. लोकसभेच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून भाजपा व शिवसेना युतीचे घोडे गंगेत न्हालं असलं तरी मीरा-भार्इंदरमध्ये मात्र युती अजुनही मुर्धाच्या खाडीत गटांगळ््या खात आहे. महापालिकेत भाजपाची एकहाती असलेली सत्ता आणि सुसाट नेतृत्वाला शिवसेनेची अजिबात न उरलेली गरज यामुळे सेनेने कितीही युतीची टाळी दिली तरी भाजपा कडून हात आखडता घेतला जातोय. सेनेच्या लहानसहान सुचना सुध्दा भाजपाने धुडकावून लावल्या आहेत. शिवाय लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सेनेला शहरात भाजपाचे पाय धरावेच लागणार आहेत. त्यामुळे मीरा भार्इंदरमध्ये आवाज फक्त भाजपाचाच चालणार असे आ. नरेंद्र मेहता सेनेला वारंवार विविध माध्यमातून ठणकावून सांगत आहेत.

साम, दाम, दंड व भेदाचे बाळकडू प्यायले असल्याने आ. मेहतांनी पालिका जिंकण्यासाठी निवडणुकीच्या आधीपासूनच आपले कसब पणाला लावले आहे. पक्ष संघटना बांधणीत तर भाजपाने सेनेला कुठल्या कुठे मागे फेकले. पालिका जिंकून मुख्यमंत्र्यांना भेट देण्याचा चंग बांधलेल्या आ. मेहतांना स्थानिक पक्ष कार्यकर्ते, उमेदवार, सहकाऱ्यांपासून थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत भक्कम साथ मिळाली. पालिका खिशात घालत मेहतांनी मुख्यमंत्री दरबारी आपले वजन आणखी वाढवले.

मुख्यमंत्र्यांचा वरदहस्त लाभल्याने आ. मेहतांनी महापालिका तर आपल्या मुठीत ठेवली आहेच, पण पोलीस, महसूल, नगरविकास, सांस्कृतिक, वन आदी विभाग खिशात ठेवले आहेत. याला कारण आ. मेहतांचे जातीने असलेलं बारीक लक्ष, दिवसरात्र वेळ देणे आणि हात धुऊन एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे हेच कारण आहे.

शिवसेनेकडे शहरात अभ्यासू, मुद्देसुद व आक्रमक असं नेतृत्वच नाही. त्यामुळे सर्व भिस्त आहे ती केवळ आमदार प्रताप सरनाईकांवर. मध्यंतरी एकमेकांविरोधात आरोपप्रत्यारोप करताना त्यांनी टोकाची पातळी गाठली होती. खासदार म्हणून सेनेचे राजन विचारे असले तरी ते पालिका व शहराच्या घडमोडीत फारशी ढवळाढवळ करीत नाहीत.

विरोधी पक्ष नेतेपद, समिती सभापतीपद व दालनांपासून नगरसेवकांचा प्रभाग समिती निधी असो की प्रभागातील लहानसहान कामे. आ. मेहतांच्या दबावामुळे पालिका प्रशासन सेनेच्या नगरसेवकांना झुलवत ठेवत आहे. नगरसेवकांचे सोडा खुद्द आ. सरनाईकांना सुद्धा कोंडीत पकडण्याची एकही संधी मेहता सोडताना दिसत नाहीत. घोडबंदर किल्ल्या वरील सेनेच्या कार्यक्रमाचे निमंत्रण सरनाईकांनी त्यांना दिले. पण मेहतांनी तो कार्यक्रम टाळला. उलट विचारे, सरनाईक मेहतांच्या मंदिराच्या कार्यक्रमाला आवर्जून हजर राहिले.

स्थायी समिती सभेत अर्थसंकल्पाला सेनेच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला. पण भाजपाने मात्र आपल्याला सेनेची गरज नसल्याचा अविर्भाव कायम ठेवला. मेहतांनी तर बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवन व कलादालनाची निविदा स्थायी समितीमध्ये मंजुर करु दिली नाही. अर्थसंकल्पात शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवनासाठी दोन कोटींची वाढ, डॉ. बाबासाहेब सांस्कृतिक भवनासाठी नवीन लेखाशीर्षांतर्गत १ कोटींची तरतूद, घोडबंदर किल्ल्यासाठी आणखी एक कोटींची वाढ सुचवली. मात्र भाजपाने महासभेत त्या सूचना धुडकावून लावल्या. भाजपाने आपला ताठरबाणा कायम ठेवत सेनेला नामोहरम करण्याची एकही संधी सोडलेली नाही.

Web Title: The BJP has a voice in Meera-Bhayander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.