ठाणे: घराघरांत भाजपकडून नागरिकांशी संवाद; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारकिर्दिला आठ वर्षे पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 08:11 PM2022-06-19T20:11:20+5:302022-06-19T20:11:52+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानपद आणि केंद्र सरकारच्या कारकिर्दीला आठ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपातर्फे नागरिकांशी रविवारी संवाद साधण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानपद आणि केंद्र सरकारच्या कारकिर्दीला आठ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपातर्फेठाणे शहरातील ४७ प्रभागांमध्ये घरांघरांमध्ये नागरिकांशी रविवारी संवाद साधण्यात आला. खासदार विनय सहस्रबुद्धे, भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी नागरिकांना मोदी यांनी केलेले कार्य स्पष्ट करून सांगितले. त्याचबरोबर कल्याणकारी योजनांमध्ये सहभाग घेण्याचे आवाहनही केले.
भाजपातर्फे सध्या देशभरात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण अंतर्गत संपर्क अभियान राबविले जात आहे. या अभियानात केंद्र सरकारने राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली जात आहे. मोफत अन्न-धान्य, पंतप्रधान आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, आयुष्मान भारत योजना, मोफत कोरोना लसीकरण, फेरीवाल्यांना कर्जन, किसान सन्मान निधी, जनधन योजना, स्टॅंड अप इंडिया, कौशल्य विकास योजना आदी योजनांसह श्री राम मंदिराचे बांधकाम, काशी विश्वनाथ धाम व केदारनाथ धामचे नुतनीकरण, घटनेतील ३७० कलम रद्द, तिहेरी तलाक पद्धत रद्द आदींकडेही नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले. या योजनांच्या अंमलबजावणीतून कुटुंबांचा वैयक्तिक विकास होणार आहे. त्यासाठी प्रत्येक कुटुंबाने योजनांचा फायदा घ्यावा, असे आवाहन भाजपाकडून नागरिकांना करण्यात आले. त्याला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
ठाणे शहरातील ४७ प्रभागांमध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट नागरिकांबरोबर संवाद साधला. येऊरच्या आदिवासी वस्तींपासून मुंब्र्यातील वसाहतीत आणि नौपाड्यापासून गायमुखपर्यंत विविध भागात ही मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेत भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा माधवी नाईक, सचिव संदिप लेले, माजी गटनेते मनोहर डुंबरे, संजय वाघुले, मृणाल पेंडसे, आदी पदािधकारी आिण कार्यकर्ते माेठया प्रमाणात सहभागी झाले होते.