“कोणाचे पक्ष फोडण्यात भाजपला स्वारस्य नाही, कोणी असंतुष्ट होऊन पक्षात आले तर स्वागत”
By नितीन पंडित | Published: September 3, 2022 08:39 PM2022-09-03T20:39:03+5:302022-09-03T20:41:07+5:30
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य.
भिवंडी : "आता भाजपाला कोणता दुसरा राजकीय पक्ष फोडण्यात स्वारस्य नाही ,भारतीय जनता पार्टी कोणताही पक्ष फोडत नाही. पण कोणत्या पक्षात फूट पडून ते आम्हाला मदत करायला येत असतील तर त्यांच्या सोबत एकत्र यायला आम्ही तयार आहोत," असे वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे. शुक्रवारी रात्री दानवे केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या भिवंडीतील निवासस्थानी गणरायाच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हेदेखील होते.
लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरवात स्वातंत्र्य काळात सर्वांनी एकत्र येण्याच्या उद्देशाने केली. आता गणपती उत्सवामध्ये सर्वच जण एकमेकांकडे जातात. देवेंद्र फडणवीस व अशोक चव्हाण यांची एका त्रयस्थ व्यक्तीच्या घरी भेट झाली. त्याचे असे अर्थ लावण्यात आले. पण त्यांच्या मध्ये असंतोष असेल तर त्याचा आम्ही आता काही उपयोग करणारा नाही पण आम्हला जेव्हा गरज पडेल, उपयोग होईल असे वाटेल तेव्हा आम्ही असंतुष्टांचा उपयोग करून घेऊ. आज आम्हाला कोणाची गरज नसल्याचे दानवे म्हणाले.
"कोणी आपल्या पक्षात असंतुष्ट होत आमच्या पक्षात आलं तर स्वागत आहे. आमच्या विचारांशी सहमत व्हावं. ही वैचारिक लढाई आहे," अशी प्रतिक्रिया दानवे यांनी अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना दिली.