बीकेसीत बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार मिळतील, दसरा मेळाव्याला जायला आवडेल: नारायण राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 06:02 AM2022-10-05T06:02:13+5:302022-10-05T06:02:51+5:30
बीकेसीत होणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा मेळावा आहे, असे नारायण राणे म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मला जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याचे निमंत्रण दिले आणि माझा पक्ष भाजपने तिथे उपस्थित राहण्याची परवानगी दिली, तर मी बीकेसी येथील दसरा मेळाव्याला जाईन, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले. सोमवारी रात्री उशिरा राणे यांनी ठाण्यातील शिंदे गटाचे आमदार रवींद्र फाटक आयोजित नवरात्रोत्सवाला भेट दिली.
शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे होत आहेत; पण बीकेसी येथील मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार मिळतील. तिथे होणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा मेळावा आहे, असे ते म्हणाले. या मेळाव्याचे अद्याप मला आमंत्रण आलेले नाही; पण त्याचं आमंत्रण आलं आणि माझा पक्ष असलेल्या भाजपने मला तिथे जाण्याची परवानगी दिली, तर मी तिथे नक्की उपस्थित राहीन, असे ते पुढे म्हणाले.
अंधेरी येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा दर्शवला आहे. त्याबाबत राणे यांना विचारले असता ते म्हणाले की, त्याने काही फरक पडत नाही. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद काय आहे ते सर्वश्रुत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"