भाईंदरमध्ये सेनेच्या विभागप्रमुखाला भाजप गटनेत्याकडून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:23 AM2019-11-12T00:23:04+5:302019-11-12T00:23:07+5:30
मीरा-भाईंदर महापालिकेतील भाजप गटनेते हसमुख गेहलोत यांनी मुलांच्या खेळण्यावरून झालेल्या वादात शिवसेनेचे विभागप्रमुख सतीश अंचेकर (५७) यांना मारहाण केली.
भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेतील भाजप गटनेते हसमुख गेहलोत यांनी मुलांच्या खेळण्यावरून झालेल्या वादात शिवसेनेचे विभागप्रमुख सतीश अंचेकर (५७) यांना मारहाण केली. याप्रकरणी नवघर पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. तर, मुलांच्या खेळण्याचे निमित्त असून राजकीय आणि सोसायटीचा
वाद यामागे आहे, असे अंचेकर याचे म्हणणे आहे. भार्इंदर पूर्वेला गोल्डन नेस्ट वसाहतीजवळ विधी हाइट्स नावाची इमारत आहे. या इमारतीत शिवसेनेचे विभागप्रमुख अंचेकर राहत असून ते गृहनिर्माण संस्थेचे सचिव आहेत. याच इमारतीत भाजप गटनेते हसमुख गेहलोत यांची सदनिका आहे. मात्र, गेहलोत हे कुटुंबीयांसह शेजारच्या विधी अपार्टमेंटमध्ये राहतात. अंचेकर यांच्या म्हणण्यानुसार, रविवारी सायंकाळी गेहलोत यांचा लहान मुलगा हिरण्य (११) हा अन्य दोघा मुलांसह विधी हाइट्स इमारतीत खेळण्यासाठी आला होता. शेजारी राहणाऱ्या लहान मुलाने बाजूच्या इमारतीतून
मुले येतात आणि आम्हाला खेळू देत नाहीत, अशी तक्रार केली. त्यावरून मी गेहलोत व अन्य मुलांना तुम्ही तुमच्या इमारतीच्या आवारात जाऊन खेळा, असे सांगितले. काही वेळाने गेहलोत हे पत्नी, मुलासह आले आणि मुलाला शिवी का दिली म्हणून दरडावू लागले. मी शिवी कशाला देऊ, असे सांगूनही त्यांनी मला बॅटने रक्त निघेपर्यंत मारहाण केली, असे अंचेकर म्हणाले. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यास गेलेल्या अंचेकर यांना पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करून घेण्यास नकार देत तक्रार अर्ज द्या, असा पवित्रा घेतला होता. रक्त निघत असूनही पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने थेट खासदार राजन विचारे आदींनी चांगलीच कानउघाडणी केली. त्यानंतर पोलिसांनी गेहलोत यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला.
मुलांचे निमित्त गेहलोत करत असून याआधीही त्यांनी तीन वेळा असे प्रकार केले आहेत. विधी हाइट्सच्या तळमजल्यावर बिल्डरच्या संगनमताने दोन सदनिका बेकायदा बांधल्या होत्या. त्या आम्ही तक्रारी करून तोडायला लावल्या. त्याचा रोष आहे. शिवाय, शिवसेनेचे पदाधिकारी असून गेहलोत आता स्थानिक नगरसेवक आहेत. मुलांचे निमित्त असून शिवीगाळ केलेली नाही, असे अंचेकर म्हणाले.
>शिवीगाळ केल्याचा गेहलोत यांचा आरोप
गेहलोत यांनी मात्र अंचेकर यांनी मुलास शिवीगाळ केली. त्याच्यासोबतच्या मुलांनीही तसे त्यांच्यासमोरच सांगितले. माझी सदनिका त्या इमारतीत आहे. मुलांना खेळण्यास मनाई करणे, शिवीगाळ करणे निंदनीय आहे. अंचेकर अन्य कारणे सांगून दिशाभूल करत असल्याचे गेहलोत म्हणाले.