शेतकरी फसवणूकप्रकरणी मंगळवारी भाजपचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 12:51 AM2020-02-23T00:51:45+5:302020-02-23T00:51:55+5:30
निरंजन डावखरे यांची माहिती; आघाडी सरकारचा करणार निषेध
ठाणे : शेतकऱ्यांची फसवणूक, राज्यातील महिलांची सुरक्षा या प्रमुख प्रश्नांबरोबरच राज्यातील इतर महत्त्वाच्या प्रश्नांसंदर्भात ठाण्यात येत्या २५ फेब्रुवारी रोजी मोर्चा काढून महाविकास आघाडीविरोधात निदर्शने करणार असल्याची माहिती भाजपचे ठाणे शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही निदर्शने करण्यात येणार असून त्यामध्ये दिव्यापासून ते वागळेपर्यंतचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
नवी मुंबईत नुकत्याच झालेल्या भाजपाच्या राज्यव्यापी मेळाव्यात महाविकास आघाडीविरोधात आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार, हे आंदोलन करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बंधाºयावर जाऊन अवकाळीग्रस्त शेतकºयांना प्रतिहेक्टर २५ हजार आणि फळबागांसाठी प्रतिहेक्टर ५० हजारांची मदत देण्याची घोषणा केली होती. मात्र, महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना याचा विसर पडला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपाचे गटनेते संजय वाघुले, नगरसेवक कृष्णा पाटील, माजी शहराध्यक्ष संदीप लेले आणि भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
महिला अत्याचारांचा जाब विचारणार
गेल्या महिनाभरात राज्यातील महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अत्याचार करणाºया गुन्हेगारांना धाक बसविण्याऐवजी महाआघाडी सरकारचे मंत्री गावोगावी सत्कार घेण्यात मश्गुल आहेत. हे सरकार सत्तेवर आल्यानंतर गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला. अॅसिडहल्ला, अल्पवयीन मुलींवर अत्याचार, बलात्कार, महिलांना जाळून टाकणे अशा घटना वाढू लागल्यामुळे महिला व तरुण मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचाही या आंदोलनात निषेध करण्यात येणार आहे.