VIDEO: भाजपाच्या माजी महापौर आणि नगरसेविकेत जुंपली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 10:02 AM2019-07-08T10:02:13+5:302019-07-08T13:16:23+5:30
भाजपाच्या माजी महापौरांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा भाजपाच्याच नगरसेविकेचा प्रयत्न
मीरारोड : माजी महापौर तथा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या इच्छुक असलेल्या गीता जैन यांच्या हस्ते ठेवलेल्या छत्री वाटपाच्या कार्यक्रमात स्थानिक भाजपा नगरसेविका रुपाली मोदी व त्यांच्या पतीने चांगलाच गोंधळ घातला. धक्काबुक्की आणि शिवीगाळ झाली. हा प्रकार पाहून स्थानिक नागरिक देखील नगरसेविकेवर नाराज झाले. रुपाली या आ. मेहता समर्थक असून मेहता व जैन यांच्यातील वादंगातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.
हाटकेश भागात राहणारे इमरान हाश्मी यांनी शनिवारी सायंकाळी हाटकेश चौक येथे ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता. उघड्यावरच एक टेबल त्यासाठी मांडला होता. माजी महापौर गीता जैन यांच्या हस्ते छत्री वाटप ठेवले होते. जैन या तेथे पोहचल्या असता छत्री वाटपावेळी पाऊस आल्याने रस्त्यामध्ये बांधलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या शेडमध्ये टेबल घेतले व त्याठिकाणी छत्री वाटप सुरु केले.
याची माहिती मिळताच रुपाली मोदी पतीसह तेथे आल्या व इकडे काही कार्यक्रम करायचा नाही, आपल्या नगरसेवक निधीतून शेड बांधली असून परवानगी घेतली आहे का? चला बाहेर निघा, असे सर्वांना सांगू लागल्या. यावेळी बाचाबाची झाली आणि जैन व मोदी यांच्यात धक्काबुक्की झाली. मोदींना जैन यांनी मागे ढकलले. तर मोदींच्या पतीला देखील उपस्थितांनी मागे ओढले. त्यावरुन ते शिवीगाळ करु लागले.
शुल्लक कारणावरुन स्थानिक नगरसेविकेने छत्री वाटप न करण्यासाठी घातलेला धूडगुस पाहून उपस्थित नागरिकांनी देखील नाराजी व्यक्त केली. पण त्यानंतर देखील छत्री वाटप पुढे सुरु करण्यात आले. जैन आणि मोदी यांच्यात बाचाबाची सुरुच होती. दरम्यान, काशिमीरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मोदी या पतीसह पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. तर पोलिसांनी इमरान यांना सुद्धा बोलावून घेत माहिती जाणून घेतली.
या घटनेमागे भाजपातील अंतर्गत संघर्ष कारणीभूत असल्याचे मानले जाते. मोदी या भाजपा आमदार नरेंद्र मेहतांच्या समर्थक मानल्या जातात. तर माजी महापौर गीता जैन देखील भाजपाच्याच असून त्यांनी मीरा भाईंदर विधानसभा मतदार संघातून भाजपाची उमेदवारी मिळावी म्हणून जोरदार प्रयत्न चालविले आहे. त्यावरुन दोघांमध्ये वाद सुरु आहे. निवडणूक जवळ येऊ लागल्याने वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. याआधी देखील जैन यांना पक्षाच्या कारणे दाखवा नोटिसा बजावण्यापासून त्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये केली गेली आहेत. महासभेत देखील मेहता समर्थक भाजपा नगरसेवकांकडून जैन यांना लक्ष्य केले होते.