भाजप सदस्यनोंदणी अभियानात रंगले मानापमान नाट्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 12:16 AM2019-07-07T00:16:37+5:302019-07-07T00:16:40+5:30
ठाणे : जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी ठाण्यात भाजपानेआयोजित केलेल्या संघटना पर्व सदस्यता अभियान २०१९ कार्यक्रमात ...
ठाणे : जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी ठाण्यात भाजपानेआयोजित केलेल्या संघटना पर्व सदस्यता अभियान २०१९ कार्यक्रमात एकीकडे नवीन सदस्यनोंदणी सुरू असताना दुसरीकडे मानापमानाचे नाट्यदेखील रंगल्याचे दिसून आले. स्टेजवर बसण्यास व न बोलण्याच्या मुद्यावरून शहराध्यक्ष विरुद्ध भाजप युवाध्यक्ष यांच्यात काहीशी तू तू मैं मैं झाल्याचे दिसून आले. अखेर, या ठिकाणाहून भाजपा युवा अध्यक्षाने काढता पाय घेतला.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत मराठी कलावंत संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, अशोक समेळ, खगोलतज्ज्ञ दा.कृ. सोमण यांच्यासह रवींद्र प्रभुदेसाई, उद्योजक समीर नातू आदींनी यावेळी आपले सदस्यत्व नोंदवले. त्यामुळे हा कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर गेला होता. तावडे यांचे आगमन होताच, सर्वांना स्टेजवर पाचारण करण्यात आले. यावेळी आमदार निरंजन डावखरे, भाजपचे गटनेते नारायण पवार हे सुद्धा स्टेजवर गेले. परंतु, त्याचवेळेस भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष निलेश पाटील हे व्यासपीठाच्या समोरील बाजूस बसले होते. त्यांना व्यासपीठावर येण्यासाठी डावखरे आणि पवार यांनी हातवारे केले. परंतु, त्यांनी आमंत्रण नसल्याने जाण्यास टाळले. या मंडळींनी पुन्हा त्यांना बोलावल्यामुळे त्यांचा मान राखण्यासाठी त्यांनी व्यासपीठ गाठले खरे. पण तेथे त्यांना मान मिळाला नाही, त्यामुळे त्यांनी व्यासपीठावरून खाली उतरून कार्यक्रमामधूनच काढता पाय घेतला. एकीकडे स्वत:ला शिस्तबद्ध पक्ष म्हणवणाऱ्या भाजपमधील हे मतभेद मंत्र्यांच्या उपस्थितीत चव्हाट्यावर आल्याची चर्चा कार्यक्रमात ऐकायला मिळाली.
मोर्चे, आंदोलने असली की, आमच्या शहराध्यक्षांना युवा मोर्चाची आठवण होते. मात्र, अशा कार्यक्रमाच्या वेळेस होत नाही. त्यामुळे आपण तेथून काढता पाय घेतला.
- निलेश पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष, भाजपा
मुळात नेमका विषय काय झाला, याची मला कल्पना नाही. परंतु, पक्षातील कोणत्याही कार्यकर्त्याने पक्षातील अंतर्गत विषयांची माहिती प्रसारमाध्यमांना देऊ नये.
- संदीप लेले, शहराध्यक्ष, भाजप