मीरा-भार्इंदरमध्ये भाजपानेच ‘करून दाखविले’, आयात उमेदवारांनी राखली शिवसेनेची लाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 02:39 AM2017-08-22T02:39:51+5:302017-08-22T02:40:20+5:30
‘शिवसेनेसारख्या दलालाच्या हाती सत्ता दिलीत, तर त्यांना प्रत्येक कामासाठी शेवटी माझ्याकडेच यावे लागेल. त्यामुळे थेट भाजपाला सत्ता द्या,’ हे मुख्यमंत्र्यांचे आवाहन मनावर घेतल्याइतका दणदणीत विजय मतदारांनी त्या पक्षाच्या पदरात घालत निर्विवाद बहुमत हाती दिले आहे.
ठाणे : ‘शिवसेनेसारख्या दलालाच्या हाती सत्ता दिलीत, तर त्यांना प्रत्येक कामासाठी शेवटी माझ्याकडेच यावे लागेल. त्यामुळे थेट भाजपाला सत्ता द्या,’ हे मुख्यमंत्र्यांचे आवाहन मनावर घेतल्याइतका दणदणीत विजय मतदारांनी त्या पक्षाच्या पदरात घालत निर्विवाद बहुमत हाती दिले आहे. त्यामुळे मीरा-भार्इंदरमध्ये शिवसेनेपेक्षा भाजपानेच ‘करून दाखविल्याची’ स्थिती आहे. शिवसेना दुसºया क्रमांकाचा पक्ष असला, तरी त्यांच्या साधारण निम्म्या जागा या आयात उमेदवारांनी भरून काढल्याने, संख्येत शिवसेनेचा फायदा दिसत असला, तरी मागील निकालांच्या तुलनेत त्या पक्षाची पीछेहाट झाल्याचे निकालातून स्पष्ट झाले.
निवडून येण्याच्या क्षमतेवर इतर पक्षांतील खासकरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील आणि काही प्रमाणात काँग्रेस, शिवसेना यातील उमेदवार फोडून भाजपाचे स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांनी केलेली पूर्वतयारी पक्षाला यशापर्यंत घेऊन गेली. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी अनेक प्रभाग हेरून काही उमेदवारांना आधीच प्रचार सुरू करण्यास सांगितले होते. त्यांच्या कार्यपद्धतीबाबत भरपूर तक्रारी होत्या. पक्षांतर्गत विरोध होता. पण, प्रत्येक प्रभागानुसार विजयाची नेमकी गणिते आखण्यात त्यांच्याइतका कोणाचाच हातखंडा नाही, हे जाणून पक्षाने त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचा घेतलेला निर्णय योग्य ठरला आणि भाजपाने मागील निवडणुकीतील ३१ जागांवरून ६१ वर झेप घेतल्याने मूळची ताकद राखत पक्ष वाढल्याचे स्पष्टपणे दिसून आले. त्यातही गुजराती, जैन, मारवाडी, उत्तर भारतीय असा ‘अमराठी’ म्हणून उल्लेख होणारा मतदार मोदीलाटेपासून भाजपाच्या सोबत आहे, यावरही शिक्कामोर्तब झाले. ते पाहता पक्षाच्या जाहीर सभांत मुख्यमंत्र्यांनी मराठीऐवजी हिंदीतून भाषणे का केली, ते समजू शकेल.
शिवसेना मात्र निवडणूक रणनीतीच्या आखणीपासून कमी पडत गेली. ठाणे जिल्ह्यावर एकछत्री अंमल असलेले पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवत थेट मातोश्रीच्या संपर्कात असलेले स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या हाती निवडणुकीची धुरा सोपविली होती. खासदार राजन विचारे हेही त्यांच्यासोबत होते. सरनाईक यांनी मीरा-भार्इंदरमध्ये आजवर नरेंद्र मेहता यांना सांभाळून घेत राजकारण केल्याने शिवसेना संघटना म्हणून तेथे फारशी वाढलीच नाही, त्याचा फटका स्वबळावर लढताना पक्षाला बसला. भाषा आणि कृती जरी आक्रमक असली; तरी निवडणुकीच्या काळापुरते बाहेरून आणून जबाबदारी दिलेले खासदार, आमदार, नगरसेवक शेवटच्या महिनाभरात पक्षाला किती ताकद देऊ शकतात, याचे भान या निवडणुकीने शिवसेनेला दिले. भाजपाची मीरा-भार्इंदरमध्ये वाढलेली ताकद आमदार म्हणून सरनाईकांच्या आणि खासदार म्हणून राजन विचारे यांच्या राजकीय अस्तित्वाला धक्का देणारी आहे. शिवसेनेच्या काही नेत्यांनी पुढील वर्षभरात भाजपात जाण्याची तयारी केली होती आणि त्याआधारे पक्षात दबावगट निर्माण केला होता. पण, या निकालाने त्यांची ताकद शिवसेनेला जशी समजली, तशीच भाजपालाही. त्यामुळे त्यांच्या दोन्ही पक्षांतील राजकीय अस्तित्वाचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. त्या अर्थाने ही पालिका निवडणूक शिवसेनेवर दूरगामी परिणाम करून जाईल. जाहीरनाम्यात हिंदी भाषिक भवन उभारण्याचे आश्वासन द्यायचे आणि सभेत मात्र मराठीला विरोध केला तर तंगड्या तोडू, अशी भाषा करायची, यातील विरोधाभास शिवसेनेला स्पष्ट करता आला नाही. शिवसेनेच्या विजयी उमेदवारांतील जवळपास निम्मे आयात आहेत आणि त्यातील निम्मी ताकद राष्ट्रवादीतून आलेल्या गिल्बर्ट मेंडोन्सा यांची आहे हे पाहता शिवसेनेने मागील १४ जागांवरून २२ वर मारलेली मजल ही ताकद वाढल्याचे दर्शवत असली, तरी आयात उमेदवार वजा केल्यावर ती कमी भरते, हे संख्याशास्त्र लक्षात घेण्याजोगे आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपाने ज्या पद्धतीने आधीच खिंडार पाडले होते आणि नंतर माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांनी शिवसेनेत जाऊन आपल्यासह समर्थकांची ज्या पद्धतीने काळजी घेतली होती, ते पाहता राष्ट्रवादी या निवडणुकीत संपलेली असेल, हे निवडणुकीपूर्वीच स्पष्ट झाले होते. पक्ष म्हणून राष्ट्रवादीचे अस्तित्व उरले नव्हते आणि गणेश नाईक- संजीव नाईक या पितापुत्रांना आयत्या वेळी जबाबदारी दिल्यावर त्यांनाही त्यात रस नव्हता, हे वेळोवेळी दिसत होते. पक्षाच्या एकाही नेत्याने निवडणूक काळात मीरा- भार्इंदरला न फिरकून पक्षाला तेथून किती अपेक्षा आहेत, हे दाखवून दिले होते. त्यानुसार, पक्षाने गेल्या निवडणुकीतील २६ जागांवरून कामगिरी थेट शून्यावर आणली!
काँग्रेसलाही या निवडणुकीत फटका बसला. फाटाफूट, नगरसेवकांनी दिलेली सोडचिठ्ठी यातून धक्का बसला असला, तरी त्या पक्षाने सावरण्याचा भरपूर प्रयत्न केल्याचे निवडणूक काळात जाणवले. मुस्लिम आणि उत्तर भारतीयांवर लक्ष देत पक्षाने पुन्हा पारंपरिक मतदारांना साद घातली. निवडणूक जाहीर झाल्यापासून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दोन सभा घेतल्या. नंतरही पक्षातील गटबाजी फारशी दिसून आली नाही. पक्षाचे १० आणि दोन पुरस्कृत असे १२ उमेदवार विजयी झाले. मागील निवडणुकीपेक्षा सहा जागा कमी झाल्या असल्या, तरी काँग्रेसचे राष्ट्रवादीसारखे पानिपत झाले नाही. निकालानंतर काँग्रेस-शिवसेना एकत्र येणार असल्याच्या चर्चेमुळे ना काँग्रेसचा फायदा झाला, ना तोटा.
गेल्या वर्ष-दीड वर्षात संघटना म्हणून विसविशीत झालेल्या मनसेकडून फारशा अपेक्षा नव्हत्या. त्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या निवडणुकीकडे दुर्लक्ष करून ते दाखवून दिले आणि मतदारांनीही त्यावर शिक्कामोर्तब केले.
साधारणत: सत्ताधाºयांना न दुखावता राजकारण करणारा बहुजन विकास आघाडी हा हितेंद्र ठाकूर यांचा पक्ष वसई-विरारबाहेर फारसे अस्तित्व दाखवू शकत नाही, हे या निकालाने दाखवून दिले. नरेंद्र मेहता यांच्या सोबतीनेच त्यांचे आतापर्यंतचे राजकारण होते. त्यामुळे चतुर मेहता यांनी त्यांना शेवटपर्यंत झुलवत ठेवले. ते लक्षात आल्यावर त्यांनी स्वबळाची भाषा केली. पण, संघटनेची घडीच बसवलेली नसल्याने त्यांना काहीही कामगिरी करता आली नाही. तोच प्रकार शिवमूर्ती नाईक, मिलन म्हात्रे यांच्या संघर्ष मोर्चाचा. दुसरी भाजपा स्थापत असल्याचा आव त्यांनी आणला खरा, पण प्रत्यक्ष निवडणूक काळापर्यंत कोणीही त्यांच्यासोबत राहिले नाही आणि त्यांचे राजकीय उपद्रवमूल्य किती तोकडे होते, हे दाखवून दिले.
एकंदरीतच लोकसभा निवडणुकीपासून सोबत ठेवलेली मतपेढी भाजपाने सांभाळून ठेवली आणि त्यात भरच घालण्याचे काम या निवडणुकीतून करून दाखवले.
कोणी कमावले? कोणी गमावले?
मागील पालिका निवडणुकीशी तुलना करता भजापाला ३१ जागांचा थेट फायदा झाला. शिवसेनेलाही आठ जागांचा फायदा झाला आहे.
काँग्रेसने दहा जागांवर थेट विजय मिळविला आणि दोन जागी त्या पक्षाचे पुरस्कृत उमेदवार विजयी झाले. ते पाहता, त्या पक्षाला मागील निवडणुकीपेक्षा सहा जागांचा तोटा झाला. राष्ट्रवादी काँग्रेस शून्यावर बाद झाल्याने त्यांचे थेट २६ जागांचे नुकसान झाले.
ठाकूर अपयशी
काँग्रेस पक्षालाही फुटीचे ग्रहण लागले, पण त्यातून सावरत त्या पक्षाने दहा जागी थेट व दोन जागांवर पुरस्कृत उमेदवारांच्या साह्याने विजय मिळविला. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला अपयश आले.
भाजपा-शिवसेनेत रंगले वाक्युद्ध
मुंबई : मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा आणि शिवसेनेत जोरदार वाक्युद्ध रंगले. ‘मीरा भार्इंदरकरांनी लबाडाघरचे आमंत्रण नाकारले,’ अशा शब्दांत मुंबई भाजपाध्यक्ष आ.आशिष शेलार यांनी शिवसेनेला चिमटा काढला, तर पानिपतच्या युद्धानंतर मराठ्यांनी नव्या उमेदीने उभारी घेतली होती. अशीच उभारी शिवसेना घेईल आणि इतरांचे पानिपत करेल, असा प्रतिटोला शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी भाजपाला लगावला.
‘मीरा-भार्इंदरवर दुसरे कोणतेही फडके फडकणार नाही. फडकेल तो फक्त भगवाच,’ असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रचारादरम्यान केले होते. मात्र, मतदारांनी भाजपाकडे एकहाती सत्ता दिल्यानंतर, आशिष शेलार यांनी शिवसेनेची खिल्ली उडविली. ‘मुंबईत दमछाक. पालघर, कल्याण-डोंबिवलीत अडले, पनवेलमध्ये भोपळा एमएमआरमध्ये पाचव्यांदा मतदारांनी उघडा केला ‘काहींच्या’ ताकदीचा असली चेहरा!’ असे टिष्ट्वट केले. मतदारांनी ‘लबाडाघरचे आमंत्रण’ नाकारले. पारदर्शी विकासाची हमी देणाºया भाजपाचा दणदणीत विजय करून स्वीकारले, अशा शब्दात शेलार यांनी शिवसेनेला डिवचले.
आ.शेलार यांच्या टिष्ट्वटला शिवसेना नेते आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी प्रतित्युर दिले. १७६१ साली मराठे आणि अहमदशहा अब्दाली यांच्यात पानिपत येथे युद्ध झाले. त्यात मराठ्यांचा पराभव झाला होता, परंतु त्यानंतर मराठ्यांनी पुन्हा उभारी घेऊन देश पादाक्रांत केला. या इतिहासाची शिवसेना पुनरावृत्ती करेल, असा विश्वास रावते यांनी व्यक्त केला. निवडणुकीपूर्वी भाजपा आणि शिवसेनेतील कुरघोडीचे राजकारण निकालानंतरही चालूच आहे.