ठाण्यातील अभियंत्याला मारहाण: गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचाही आरोपींंमध्ये समावेश करण्याची भाजपच्या आमदारांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 08:42 PM2020-04-09T20:42:06+5:302020-04-09T20:52:32+5:30
ठाण्यातील अभियंत्याला मारहाण प्रकरणामध्ये गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे उपस्थित असल्याचा उल्लेख फिर्यादीमध्ये आहे. त्यामुळेच या प्रकरणात आरोपी म्हणून आव्हाड यांच्याही नावाची नोंद करावी. तसेच याप्रकरणी सुरक्षा रक्षक पोलिसांचे निलंबन करुन त्यांची चौकशी करावी, अशी मागणी आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी केली आहे.
ठाण्याचे भाजप आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानी ५ एप्रिल रोजी झालेल्या मारहाणीचा प्रकार हा महाराष्ट्राच्या न्यायव्यवस्थेला काळीमा फासणारा आहे. पोलिसांच्या उपस्थितीतच अनंत करमुसे यांना मारहाण झाली. केवळ फेसबुकवर आव्हाडांविरुद्ध कमेंट केल्याने हा प्रकार झाला. करमुसे यांच्या घोडबंदर रोडवरील निवासस्थानी गणवेशातील दोन पोलिसांसह चौघेजण गेले. तिथूनच त्यांना बेकायदेशीरपणे आव्हाड यांच्या निवासस्थानी नेले. तिथेच झालेल्या मारहाणीच्या वेळी आव्हाड हे उपस्थित असल्याचा फिर्यादीमध्येही उल्लेख आहे. वर्तकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करतांना केवळ एक अनोळखी आरोपी अशी फिर्याद नोंदवली. त्यामुळेच या प्रकरणात आव्हाड यांच्या नावाचीही नोंद करावी. तसेच याप्रकरणी सुरक्षा दलातील पोलिसांचे निलंबन करुन चौकशी करावी. करमुसे आणि आव्हाड यांच्या घराबाहेरील आवाराचे सीसीटीव्ही चित्रण मिळवून चौकशी करावी. तसेच योग्य ती कार्यवाही करावी, असेही या निवेदनात भाजपच्या आमदारांनी म्हटले आहे. दोन्ही बाजूंकडून परस्पर विरोधी मागण्या आणि तक्रारींमुळे हा वाद मात्र चांगलाच चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.