भाजप आमदार नरेंद्र मेहता, पालिका आयुक्तांवर गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 02:34 AM2019-09-22T02:34:09+5:302019-09-22T02:34:22+5:30
न्यायालयाचे आदेश; ७११ वादग्रस्त क्लब, तारांकित हॉटेल प्रकरण
ठाणे : मीरारोडच्या कनकिया भागातील वादग्रस्त ७११ क्लब तथा तारांकित हॉटेल प्रकरणी अखेर भाजप आमदार नरेंद्र मेहतांसह पालिका आयुक्त व सर्व संबंधित अधिकाऱ्यां विरोधात मीरारोड पोलिसांनी अखेर शनिवारी गुन्हे दाखल केले. मुंबई उच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी दिलेल्या आदेशावरुन ही कारवाई करण्यात आली.
कनकिया भागातील नाविकास क्षेत्र, सीआरझेड, भरतीची उच्चतम रेषा, कांदळवन असलेल्या जागेत बेकायदेशीर भराव घालून पर्यावरणाचा ºहास केल्याबद्दल तब्बल चार गुन्हे दाखल केले. तसेच पालिकेने देखील एमआरटीपीखाली गुन्हा दाखल केला होता.
महापालिकेने वादग्रस्त ठिकाणी विकास नियंत्रण नियमावली व दाखल गुन्हे दुर्लक्षित करुन २०१५ साली पहिली बांधकाम परवानगी दिली. बेसमेंट, तळअधिक एक मजला अशी जिमाखाना वापरासाठी दिलेली बांधकाम परवानगी २०१७ मध्ये जिमखाना व क्लब हाऊस अशी सुधारीत करुन दिली. २०१८ मध्ये क्लब हाऊस व तारांकित हॉटेल करीता अधिकचे एक चटईक्षेत्र देण्यात आले.
या ठिकाणी कोणताही राज्य व राष्ट्रीय महामार्ग नसताना शासनाच्या २०१५ मधील अधिसुचनेचा महामार्गालगतचा हवाला देऊन एक चटईक्षेत्र मंजूर करुन घेतले. याबाबतच्या तक्रारीची पोलीसांनी दखल घेतली नव्हती. त्यामुळे उच्च न्यायालयात याचिका दाखल केली गेली असता न्यायालयाने तक्रारदाराच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्याअनुषंगाने शनिवारी आ. मेहतांसह पालिका आयुक्त व संबंधित अधिकारी यांच्या विरोधात मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर आ. मेहता अडचणीत आले आहेत.