भाजपा आमदाराच्या विधिमंडळातील लक्षवेधीला स्वपक्षीय नगरसेवकांची आडकाठी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 03:45 PM2022-03-04T15:45:37+5:302022-03-04T15:56:31+5:30
ठाणे : शहरातील व्यायामशाळा, समाज मंदिरे हे किमान नाममात्र दरात न देता रेडीरेकनर दरानुसार देण्यासंदर्भातील लक्षवेधी भाजपचे आमदार संजय ...
ठाणे : शहरातील व्यायामशाळा, समाज मंदिरे हे किमान नाममात्र दरात न देता रेडीरेकनर दरानुसार देण्यासंदर्भातील लक्षवेधी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी विधिमंडळात मांडली होती. त्यानुसार महापालिका हद्दीतील वास्तू रेडीरेकनर दरानुसार देण्यास सुरुवात झाली. मात्र, त्यांच्या या लक्षवेधीला ठाण्यातील भाजपच्याच नगरसेवकांनी वाटाण्याच्या अक्षता दाखविल्याचा प्रकार गुरुवारच्या महासभेत समोर आला. या वास्तू किमान नाममात्र दरातच द्याव्यात, अशी मागणी भाजपच्या नगरसेवकांनी करून तसा ठरावही केला.
या महासभेत भाजपच्या नगरसेविका कविता पाटील यांनी समाज मंदिर किंवा व्यायामशाळांसंदर्भात मुद्दा उपस्थित केला. त्यावर महापौर नरेश म्हस्के यांनी पूर्वी किमान नाममात्र दरातच या वास्तू संस्थांना उपलब्ध करून दिल्या जात होत्या. आमदार, नगरसेवक यांच्या निधीतून त्या उभारल्या जात होत्या; परंतु त्या नाममात्र दरात देऊ नये, यासाठी विधिमंडळात एका लोकप्रतिनिधीने लक्षवेधी मांडली होती. त्यानंतर या वास्तू रेडीरेकनर दरानुसार देण्याचा निश्चित केले, त्यामुळे या वास्तू घेण्यास संस्था पुढे येईनाशा झाल्या, तसेच या वास्तूंचीदेखील दुरवस्था झाली.
हाच मुद्दा धरून राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला यांनी आमदार संजय केळकर यांनीच तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात हा मुद्दा उपस्थित करून लक्षवेधी मांडली होती, हे निदर्शनास आणले. त्यावेळेस महाराष्ट्रात भाजपचे सरकार होते, त्यामुळे चूक महापालिका प्रशासनाची नाही तर तुमच्या सरकारची होती, असेही त्यांनी सुनावले. यावरून गोंधळ झाला. अखेरीस या वास्तू किमान नाममात्र दरात उपलब्ध करून देण्याचा ठराव केला असता त्याला भाजप नगरसेवकांनी पाठिंबा दिला.