भाजपा मित्रपक्षांना कधीच धोका देत नाही; बिहारमधील सत्तांतरावर देवेंद्र फडणवीसांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 07:11 AM2022-08-11T07:11:29+5:302022-08-11T07:11:36+5:30

ठाण्यात ‘लोकमत’ ने अद्ययावत ऑफिस सुरू केले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी माध्यमांसोबत ते बोलत होते.

BJP never threatens allies; Statement of DCM Devendra Fadnavis on the transfer of power in Bihar | भाजपा मित्रपक्षांना कधीच धोका देत नाही; बिहारमधील सत्तांतरावर देवेंद्र फडणवीसांचं विधान

भाजपा मित्रपक्षांना कधीच धोका देत नाही; बिहारमधील सत्तांतरावर देवेंद्र फडणवीसांचं विधान

Next

ठाणे : भाजप मित्रपक्षांना कधीही धोका देत नाही. बिहारमध्ये भाजपचे ७५ आणि जेडीयूचे ४२ सदस्य निवडून आल्यानंतरही नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपद दिले होते. महाराष्ट्रातही शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. आता खरी शिवसेना आमच्यासोबत आली असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केले. ठाण्यात ‘लोकमत’ ने अद्ययावत ऑफिस सुरू केले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी माध्यमांसोबत ते बोलत होते. शरद पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेत सुशील मोदी यांच्या विधानाचे समर्थन फडणवीस यांनी केले.          

मंत्र्यांचे खातेवाटप झालेले नाही. त्याबाबत विचारले असता फडणवीस यांनी, प्रसारमाध्यमांनी आधीच खातेवाटप केले असून, तुम्ही केलेले खातेवाटप  सपशेल चुकीचे असल्याचे सांगितले. भाजपचे बिहारमधील नेते सुशील मोदी यांच्या विधानाचे त्यांनी समर्थन केले. भाजप मित्रपक्षांना कधीच धोका देत नाही. मात्र जे मित्रपक्ष भाजपला धोका देतात, त्यांचे काय होते ते महाराष्ट्रात दिसले, असे विधान सुशील मोदी यांनी केले होते. फडणवीस यांनी सुशील मोदी यांच्या विधानाचे समर्थन केले.

बिहारमध्ये भाजपचे ७५ तर जेडीयूचे ४२ सदस्य निवडून आले. तरीही नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपद दिले. बिहारमध्ये आज भाजपचे सरकार गेले असले तरी ते पुन्हा येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शरद पवारांचे दुखणे वेगळे आहे. आपल्या सगळ्यांना ते माहीत आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.  ज्यावेळी पवार यांनी पक्ष बदलला, त्यावेळी कायदेच नव्हते, कोणालाही कसाही पक्ष बदलता येत होता. आज कायदे तयार झालेले आहेत, त्यामुळे कायदेशीर लढाई लढावी लागत आहे आणि एकनाथ शिंदे तेच करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ठाण्यातील गजानन महाराज चौकात ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या रथाचे उद्घाटनही फडणवीस यांच्या हस्ते झाले. 

Web Title: BJP never threatens allies; Statement of DCM Devendra Fadnavis on the transfer of power in Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.