भाजपा पदाधिकाऱ्यास खंडणीप्रकरणी अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 03:51 AM2018-06-13T03:51:30+5:302018-06-13T03:51:30+5:30
आॅर्केस्ट्रा बार चालकाकडे तक्रार न करण्यासाठी महिन्याला २० हजाराची खंडणी मागून पाच हजार खंडणी घेतल्यानंतर भाजपा पदाधिका-यासह त्याच्या दोघा साथीदारांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
मीरा रोड - आॅर्केस्ट्रा बार चालकाकडे तक्रार न करण्यासाठी महिन्याला २० हजाराची खंडणी मागून पाच हजार खंडणी घेतल्यानंतर भाजपा पदाधिका-यासह त्याच्या दोघा साथीदारांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. भाजपाचे चिन्ह व पाटी असलेली गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. अन्य दोघा बारचालकांनीही या तिघा खंडणीखोरांवर गुन्हे दाखल केले आहेत.
भार्इंदर पूर्वेला रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या रूपेश या आॅर्केस्ट्रा बार चालकाने सहायक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना भेटून आपल्याकडे ललित भानेरिया (३६) हरेंद्र सिंग (२९) व राजेश यादव (३१) हे तिघे खंडणीची मागणी करत असल्याचे सांगितले.
आमचे पोलिसांशी संबंध असून बारवर छापा टाकायला लावून बार बंद करू असे धमकावत महिना २० हजाराची खंडणीची मागणी करत असल्याचे सांगितले.
या प्रकरणी कुलकर्णी यांनी पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांना कल्पना दिली. दरम्यान, हे तिघे हप्ता घेण्यासाठी येणार असल्याची माहिती कळताच नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राम भालसिंग, अनैतिक मानवी प्रतिबंधक शाखेचे सहायक निरीक्षक संजय बांगर आदींनी सोमवारी सापळा रचला.
तीघे भाजपाचे चिन्ह व भाजपा उपाध्यक्षची पाटी असलेल्या गाडीतून बारजवळ आले. बार चालकाकडे दहा हजाराची मागणी केली असता तडजोडीनंतर पाच हजाराची खंडणी त्यांनी घेतली. ती घेताना अटक केली. भानेरियाकडे भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षाचे कार्ड सापडले.