भाजपच्या पदाधिकाऱ्याला अनधिकृत कत्तलीकरिता अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:36 AM2021-05-22T04:36:43+5:302021-05-22T04:36:43+5:30
मुंब्रा : विनापरवाना मटण विक्री करताना आढळून आलेले मुंब्र्यातील कौसा भागाचे भाजपचे मंडल अध्यक्ष सिकंदर खान यांच्यासह ...
मुंब्रा : विनापरवाना मटण विक्री करताना आढळून आलेले मुंब्र्यातील कौसा भागाचे भाजपचे मंडल अध्यक्ष सिकंदर खान यांच्यासह मो. असीफ कुरेशी या दोघांना पोलिसांनी अटक केली. कौसा भागातील श्रीलंका परिसरातील हसमत चौकामध्ये असलेल्या साहील सैफ इमारतीमधील गाळा क्रमांक तीनमध्ये जनावरांची अनधिकृत कत्तल करून मटण विक्री करण्यात येत असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तपासणी केली असता तेथे १४ ते १५ जनावरांची मुंडकी आणि मटण पोलिसांना आढळून आले. घटनास्थळी पाचारण करण्यात आलेल्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. क्षमा शिरोडकर यांनी मटण नेमके कोणत्या जनावरांचे आहे हे सांगता येत नसल्याचे सांगितल्याने मटणाचे नमुने वैद्यकीय परीक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. ४ लाख ५६ हजार रुपये किमतीचे हे १ हजार ९०० किलो वजनाचे मटण नष्ट करण्यात आले. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोघांना २७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.
...........
वाचली.