भाजप पदाधिकाऱ्याने ठेकेदारांची बैठक घेतल्याने उलटसुलट चर्चांना ऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:38 AM2021-03-28T04:38:09+5:302021-03-28T04:38:09+5:30
मीरारोड : मीरा-भाईंदर महापालिकेतील टेंडरमध्ये टक्केवारी व फिक्सिंगचे आरोप आणि नुकतीच महापालिका मुख्यालयात दोन ठेकेदारांमध्ये निविदा भरण्यावरून झालेली तुंबळ ...
मीरारोड : मीरा-भाईंदर महापालिकेतील टेंडरमध्ये टक्केवारी व फिक्सिंगचे आरोप आणि नुकतीच महापालिका मुख्यालयात दोन ठेकेदारांमध्ये निविदा भरण्यावरून झालेली तुंबळ हाणामारी, आरोपांना बळ देत असतानाच मीरारोडमध्ये एका भाजप पदाधिकाऱ्याने त्याच्या कार्यालयातच ठेकेदारांची बैठक घेतल्याचा प्रकार चर्चेत आला आहे.
महापालिकेत टेंडरसाठी होणारी चढाओढ आणि ठेकेदारांची सत्तेतील लोकांसोबत असलेली ऊठबस चर्चेचा विषय झाली आहे. जास्त दराने निविदा भारण्यासह कुठल्या कामात कोणी निविदा भरायची व त्यात दर कसे भरायचे, याबाबतचे आरोप-तक्रारी नवीन नाहीत. त्यातच महापालिका मुख्यालयात नुकतीच दोन ठेकेदारांमध्ये निविदा भरण्यावरून वाद होऊन तुंबळ हाणामारी होऊन पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात फिर्याद दिली आहे. या हाणामारीवरून टेंडर फिक्सिंगचा प्रकार चव्हाट्यावर आला असून, सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्ष आणि प्रशासनसुद्धा संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
तर ठेकेदारांच्या हाणामारीच्या घटनेआधी काही दिवसांपूर्वी एका भाजप पदाधिकाऱ्याच्या मीरारोडमधील कार्यालयात ठेकेदारांची बैठक झाली होती. सुमारे २० ते २५ ठेकेदार बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत आपसात वाद न घालता सर्वांनी मिळून निविदा भरण्याचे काम करा. त्यातच सर्वांचा फायदा आहे, वाद घालू नका, अशी चर्चा झाल्याचे एका ठेकेदाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. सत्ताधारी भाजपच्या एका पदाधिकाऱ्यानेच घेतलेली ही ठेकेदारांची बैठक चर्चेचा विषय ठरली आहे.