व्यापाऱ्यांच्या समर्थनार्थ भाजप पदाधिकारी रस्त्यावर; उल्हासनगरात बंदला संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 04:52 PM2021-10-11T16:52:07+5:302021-10-11T16:52:33+5:30
बहुतांश दुकाने उघडे
- सदानंद नाईक
उल्हासनगर : महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला शहरात समिश्र प्रतिसाद मिळाला असून व्यापाऱ्यांच्या समर्थनार्थ भाजप आमदार कुमार आयलानी यांच्यासह पदाधिकारी रस्त्यावर उतरल्याने दुपारी १२ नंतर ९० टक्के पेक्षा जास्त दुकाने उघडी होती. मात्र शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, राष्ट्रवादीचे गटनेते भारत गंगोत्री, काँग्रेसचे शहाराध्यक्ष रोहित साळवे यांनी शहरात बंदला प्रतिसाद मिळाल्याची प्रतिक्रिया दिली.
उल्हासनगर सारख्या उद्योगिक शहरात बंदला थारा दिला जात नाही. मात्र ऐन नवरात्रौत्सव, दसरा व दिवाळी सणा दरम्यान उत्तरप्रदेश येथील शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने, पुकारलेल्या बंदला व्यापारी सहकार्य करतात की नाही? असा प्रश्न शहरात निर्माण झाला. विविध व्यापारी संघटनेने बंदला विरोध न करता, दुपारी १२ नंतर दुकाने सुरू ठेवण्याची चर्चा सोशल मीडियावर केली. तर व्यापाऱ्यांच्या समर्थनार्थ भाजप रस्त्यावर उतरून बंदला विरोध करणार असल्याचा इशारा भाजप आमदार कुमार आयलानी, नगरसेवक प्रदीप रामचंदानी, राजेश वधारीया यांनी दिला होता. शहरात दुपारी १२ वाजेपर्यंत काही प्रमाणात दुकाने बंद होती. मात्र त्यानंतर ९५ टक्के पेक्षा जास्त दुकाने उघडी होती. तसेच दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे सुरू असल्याचे चित्र शहरात होते.
सोमवारी सकाळी शहर पूर्वेत दुपारी १२ वाजे पर्यंत काही प्रांगणात दुकाने उघडी होती. तर पश्चिमेला शिवसेनेचे काही प्रभाग सोडल्यास इतर दैनंदिन व्यवहार सुरू होते. एकूणच शहर बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला असून शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते भारत गंगोत्री, कॉंग्रेशचें शहाराध्यक्ष रोहित साळवे यांनी मात्र बंदला चांगला प्रतिदास मिळाल्याचा दावा केला. तर दुसरीकडे दुकाने बंद करू नका असे सांगत व्यापाऱ्यांच्या समर्थनार्थ भाजपचे आमदार कुमार आयलानी, शहरजिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, नगरसेवक राजेश वधारीया, प्रदीप रामचंदानी यांच्यासह पक्ष नगरसेवक व पदाधिकारी यांनी रस्त्यावर उतरून व्यापाऱ्यांना दिलासा दिला. बंद बाबत शहर विकास आघाडी नेत्यात समावेश नसल्याचे उघड झाले असून बंदचा फज्जा उडाल्याची टीका भाजपने केली.
उल्हासनगरात बंद शांततेत
महापालिका सत्तेत असलेल्या शिवसेना महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला, शहरात उत्तम प्रतिसाद मिळेल असे बोलले जात होते. मात्र व्यापाऱ्यांच्या असहकार धोरणामुळे बंदला समिश्र प्रतिसाद मिळून, महाविकास आघाडीवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले. गेल्या महापालिका महासभा व स्थायी समिती सभेत मालमत्ता सर्वेक्षण-मॅपिंग व २७८ कंत्राटी सफाई कामगार घेण्याच्या ठेक्यावर शिवसेना व भाजप एकत्र आल्याचे मिळाले. तर सत्ताधारी शिवसेने सोबत असलेले कॉंग्रेस, राष्ट्रवादी, ओमी टीम , साई पक्ष यांनी विरोधाची भूमिका घेतल्याने, महाविकास आघाडीवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले होते