सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 06:40 PM2023-04-21T18:40:25+5:302023-04-21T18:41:10+5:30
नरेश म्हस्के यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिपणी : कोपरीमध्ये शिवसेना-भाजपमध्ये धुमश्चक्री
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्याचे माजी महापौर तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणारे भाजपचे ठाणे शहर सचिव प्रमोद चव्हाण (४८) आणि गणेश दळवी (३८) या दोघांना कोपरी पोलिसांनी गुरुवारी अटक केली. या दोघांनाही न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले. या प्रकरणावरून म्हस्के आणि चव्हाण या दोन्ही गटांमध्ये चांगलीच धुमश्चक्री झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शिवसेना शिंदे गटाचे नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख संजय बच्छाव (४९, रा. कोपरी, ठाणे) हे २० एप्रिल २०२३ रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास त्यांच्या कोपरी येथील घरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर आनंदनगर बोगद्याजवळ काही मित्रांसमवेत उभे होते. चव्हाण यांनी गाडी येथे उभी का करता, तुम्ही नाशिक जिल्ह्याचे मराठा संघटनेचे पद भूषवत असल्याने तुम्ही तुमच्या गाड्या नाशिकमध्येच उभ्या करा, असे बच्छाव यांना सुनावले, तर दळवी यांनीही जातीवाचक टिपणी करीत त्यांना धक्का देत अपमानित केले. त्यापूर्वी प्रमोद चव्हाण यांनी त्यांच्या फेसबुकवर १९ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ७:१३ वाजेच्या सुमारास माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या संदर्भात आक्षेपार्ह टिपणी केली होती.
बच्छाव यांनी कोपरी पोलिस ठाण्यात २० एप्रिल रोजी चव्हाण आणि दळवी या दोघांविरुद्ध अनुसूचित जाती आणि जमाती, तसेच दोन गटांत तेढ निर्माण करणे, कलम १५३-अ आणि बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, या घटनेनंतर म्हस्के यांच्यासह त्यांच्या संतप्त समर्थकांनी चव्हाण यांच्या कार्यालयावर हल्ला केला. चव्हाण आणि दळवी या दोघांनाही पोलिसांनी अटक करून कारवाई केली.