भाजप-ओमी टीमचे वर्चस्व, शिवसेनेच्या वाट्याला अवघी एक समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 11:07 PM2021-03-12T23:07:57+5:302021-03-12T23:08:26+5:30

उल्हासनगर पालिका : शिवसेनेच्या वाट्याला अवघी एक समिती

BJP-OMI team dominates | भाजप-ओमी टीमचे वर्चस्व, शिवसेनेच्या वाट्याला अवघी एक समिती

भाजप-ओमी टीमचे वर्चस्व, शिवसेनेच्या वाट्याला अवघी एक समिती

Next

सदानंद नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : महापालिका विशेष समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत महाविकासला भाजपने चितपट केले. एकूण ९ विशेष समिती सभापतीपदापैकी शिवसेना एक व मित्र पक्ष असलेल्या रिपाइं गटातील पीआरपी पक्षाला एक असे दोन समिती सभापती पदावर समाधान मानावे लागले.  
उल्हासनगर महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असताना शिवसेना आघाडीने भाजपातील बंडखोर ओमी टीम समर्थक नगरसेवकांच्या मदतीने महापौर, उप-महापौर पदांसह स्थायी समिती सभापतीपद पटकावले, तसेच प्रभाग समिती सभापती निवडणुकीत वर्चस्व सिद्ध केल्यानंतर विशेष समिती  सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना आघाडी पुन्हा भाजपला चितपट करेल, असे वातावरण निर्माण झाले होते; परंतु भाजपने पक्षातील बंडखोर ओमी टीम समर्थक नगरसेवकांसोबत मिळतेजुळते घेऊन ९ पैकी ३ समिती सभापतीपदे पदरात पाडून घेतली, तर ओमी टीमकडे ४ महत्त्वाचे सभापतीपदे गेली.  

शिवसेना व मित्र पक्षाच्या वाटेला प्रत्येकी  एक असे दोन सभापती पदे मिळाली. ९ पैकी ७ समित्यांच्या सभापती पदाची निवडणूक बिनविरोध झाली. क्रीडा व पाणी पुरवठा समिती सभापती पदासाठी भाजप-शिवसेना आमनेसामने उभी ठाकले; मात्र पराभवाच्या भीतीने निवडणुकीच्या काही मिनिटांपूर्वी पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे दोन्ही उमेदवार सभापतीपदी निवडून आले. यात सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी डिंपल ठाकूर, नियोजन व विकास समिती सभापतीपदी दीपा पंजाबी, पाणी पुरवठा समिती सभापती अजित गुप्ता, आरोग्य समिती सभापतीपदी शंकर लुंड, क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या सभापतीपदी गीता साधवाणी, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी ज्योती पाटील, महसूल समिती सभापतीपदी कविता गायकवाड असे ९ पैकी ७ समित्या भाजप व पक्षातील बंडखोर ओमी टीमकडे गेल्या. तर शिवसेनेच्या शुभांगी बेहनवाल यांच्याकडे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण समिती सभापतीपद तसेच रिपाइंतील पीआरपी गटाचे प्रमोद टाले यांच्याकडे गलिच्छ नागरी समिती सभापतीपद गेले आहे. पालिकेतील राजकारण पुन्हा पेटणार हे निश्चित.

ओमी कलानी टीम नेमकी कुणाकडे? 
विधानसभा उमेदवारी कलानी कुटुंबाला दिली नसल्याच्या निषेधार्थ भाजपातील ओमी टीम समर्थक नगरसेवकांनी महापौर-उपमहापौर निवडणुकीत भाजप उमेदवाराऐवजी शिवसेना-रिपाइंच्या लिलाबाई अशान व भगवान भालेराव याना मतदान करून महापौर-उपमहापौरपदी निवडून आणले. स्थायी समिती सभापती, परिवहन समिती सभापतीपाठोपाठ प्रभाग समिती सभापतीपदी शिवसेना? आघाडीचे वर्चस्व पाहिले; मात्र विशेष समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपने ओमी कलानी टीमसोबत जुळवून घेतल्याने त्यांना ९ पैकी ७ सभापतीपदे मिळाली. या निवडणुकीनंतर ओमी कलानी टीम नेमकी कुणाकडे भाजप की शिवसेना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: BJP-OMI team dominates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.