मजूर फेडरेशनच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदी भाजपाची सरशी
By admin | Published: August 3, 2015 03:46 AM2015-08-03T03:46:25+5:302015-08-03T03:46:25+5:30
ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनच्या निवडणुकीतील सहकार पॅनलव्दारे २१ पैकी १४ जागा जिंकून बहुमत मिळविल्याचा गवगवा करणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते
ठाणे : ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनच्या निवडणुकीतील सहकार पॅनलव्दारे २१ पैकी १४ जागा जिंकून बहुमत मिळविल्याचा गवगवा करणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते या फेडरेशनच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतील अपयशामुळे चांगलेच तोंडघशी पडले आहेत. या पदांसाठी निवडून आलेल्या संचालकांनी शनिवारी भारतीय जनता पार्टी (भाजपा) पुरस्कृत सुधाकर म्हात्रे संपदा पाटील यांना मतदान केल्याने ते अध्यक्ष व उपाध्यक्षपदी निवडून आले आहेत.
भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सहकार पॅनलने या जिल्हा मजूर सहकारी संस्थेच्या संघावर (मजूर फेडरेशन) सत्ता प्राप्त केली. मात्र, अध्यक्ष व उपाध्यक्ष ही दोन्ही पदे आपल्याकडे ठेवून भाजपाने निर्विवादपणे सत्ता हस्तगत केली आहे. यासाठी भाजपाचे खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष दशरथ तिवरे येथील शासकीय विश्रामगृहात शनिवारी सकाळपासूनच तळ ठोकून होते. यामुळे कोणत्याही संचालकास अन्यत्र जाण्याची संधी मिळाली नसल्याचे तिवरे यांनी सांगितले.
या फेडरेशनच्या २१ पैकी १४ संचालकांना निवडूून आणणाऱ्या सहकार पॅनलची मजूर संघावर सत्ता राहणार असल्याचे निश्चित झाले होते. मोठ्या तोऱ्याने या विजयाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र मजूर फेडरेशनची सत्ता स्वत:हून भाजपाच्या हवाली करावी लागल्याचे उघड झाले आहे.