पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा भाजपकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:42 AM2021-05-06T04:42:43+5:302021-05-06T04:42:43+5:30
ठाणे : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर हिंसाचार सुरू केला आहे. यात ...
ठाणे : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर हिंसाचार सुरू केला आहे. यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे खून करण्यात येत आहेत. या राजकीय हिंसाचाराच्या निषेधार्थ बुधवारी भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून त्याचा निषेध केला. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
आंदोलनात खासदार विनय सहस्रबुद्धे, आमदार संजय केळकर, भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे, आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तेथे सुडाचे राजकारण सुरू झाले आहे. ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे गुंड हल्ले करीत आहेत. भाजप कार्यकर्त्यांचे खून, त्यांच्या घरांची जाळपोळ, त्यांची दुकाने किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे, असे प्रकार घडत आहेत. ही लोकशाहीची हत्या असून त्याचा तीव्र निषेध करीत असल्याचे आंदाेलकांनी सांगितले.
तृणमूल कॉंग्रेसच्या सर्व गुंडांचा ज्या प्रकारे हिंसाचार सुरू आहे, अत्याचार, हल्ले, हत्या केल्या जात आहेत, ते निषेधार्ह असून त्याच्याविरोधात हे आंदोलन करण्यात आले. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून त्यांनी आमचे निवेदन राज्यपालांकडून राष्ट्रपतींकडे पाठवावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
- विनय सहस्रबुद्धे, खासदार, भाजप
तृणमूल कॉंग्रेसच्या माध्यमातून जो काही हिंसाचर झाला आहे, त्यात सुमारे १४ कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत. ही लोकशाहीची हत्या असून त्याचा आम्ही निषेध करीत आहोत. महाविकास आघाडीने याचा साधा निषेधही केलेला नाही, याचे आम्हाला आश्चर्य वाटत आहे.
- संजय केळकर, आमदार, भाजप