रेशनिंग दुकानाची भाजपने केली पोलखोल, सर्व दुकानांची घेणार झाडाझडती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 03:02 AM2021-02-06T03:02:31+5:302021-02-06T03:03:30+5:30
रेशनिंग दुकानाच्या धाडीत सर्वसामान्यांना मिळणारे धान्य जास्तीचे आले असताना नागरिकांना मात्र कमी धान्य दिले जात असल्याची गंभीर बाब भाजपच्या पाहणीत उघडकीस आली.
ठाणे - रेशनिंग दुकानांतून सर्वसामान्यांना योग्य धान्य मिळणे गरजेचे होते. परंतु, गुरुवारी भाजपच्या महिला मोर्चाने ज्ञानेश्वरनगर परिसरातील गंगाधरनगर येथे टाकलेल्या रेशनिंग दुकानाच्या धाडीत सर्वसामान्यांना मिळणारे धान्य जास्तीचे आले असताना नागरिकांना मात्र कमी धान्य दिले जात असल्याची गंभीर बाब भाजपच्या पाहणीत उघडकीस आली. त्यामुळे आता असेच प्रकार शहरातील इतर रेशनिंग दुकानातून सुरू असण्याची दाट शक्यता असल्याने या दुकानाप्रमाणेच शहरातील इतर रेशनिंग दुकानांचीही पोलखोल केली जाईल, असा इशारा यावेळी भाजपच्या ठाणे शहर महिला अध्यक्षा मृणाल पेंडसे यांनी दिला.
ठाण्यातील काही भागातील रेशनिंग दुकानांच्या विरोधात मागील काही दिवसांपासून भाजप महिला मोर्चाकडे तक्रारी येत होत्या. त्या अनुषंगाने गुरुवारपासून शहरातील सर्वच रेशनिंग दुकानांची पाहणी करून झाडाझडतीस सुरुवात केली आहे. त्यानुसार गुरुवारी पहिल्याच दिवशी गंगाधरनगर भागातील रेशनिंग दुकानाची पाहणी केली असता सदर दुकानदार हा जास्तीचे धान्य मिळत असतानाही सर्वसामान्यांना मात्र कमी धान्य देत असल्याची पोलखोल यावेळी महिला मोर्चाने केली. त्यानुसार या दुकानदाराने ही चोरी केली असल्याचे मान्य केले. त्यानंतर ज्यांचे धान्य कमी देण्यात आले होते. त्यांना बोलावून ते धान्य त्यांना दिले गेले. यावेळी महिला मोर्चाने या रेशनिंग दुकानदाराची चांगलीच कानउघाडणी केली.
तसेच, शासनाने जी लिंक दिलेली आहे, त्यानुसार प्रत्येकाला ते मिळते आहे का? त्या लिंक विषयीदेखील सर्वसामान्यांना माहिती नाही, त्यामुळे त्यांच्यातही जनजागृती करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. यामुळे रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा अपेक्षित आहे.
प्रत्येक नागरिकाला आपल्या हक्काचे धान्य मिळाले हाच आमचा प्रमुख उद्देश यामागचा आहे. त्यानुसार हा पाहणी दौरा केला. परंतु पहिल्याच झाडाझडतीमध्ये रेशनिंग दुकानदाराने धान्याचा काळाबाजार केला असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता शहरातील सर्व रेशनिंग दुकानांची पाहणी करून पोलखोल केली जाईल.
- मृणाल पेंडसे,
ठाणे शहर महिला अध्यक्षा, भाजप