बीजेपी गोल गोल, शिवसेना झोल झोल, मिरा भाईंदरमध्ये रंगू लागला प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 06:32 AM2017-08-08T06:32:33+5:302017-08-08T06:32:33+5:30

या आठवड्यात सलग तीन दिवस असलेली सुट्टी आणि पुढील आठवड्यातील लाँग वीकएण्डमुळे सुट्टीच्या मूडमधील मतदारांना गाठण्यासाठी मीरा-भार्इंदरमधील मतदारांची धावपळ सुरू आहे. शिवसेनेने भाजपाला लक्ष्य करीत त्यांची आश्वासने गोल गोल असल्यावर भर दिला आहे.

 BJP round table, Shiv Sena Jhol Jhol, Mira Bhaindar started to propagate | बीजेपी गोल गोल, शिवसेना झोल झोल, मिरा भाईंदरमध्ये रंगू लागला प्रचार

बीजेपी गोल गोल, शिवसेना झोल झोल, मिरा भाईंदरमध्ये रंगू लागला प्रचार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : या आठवड्यात सलग तीन दिवस असलेली सुट्टी आणि पुढील आठवड्यातील लाँग वीकएण्डमुळे सुट्टीच्या मूडमधील मतदारांना गाठण्यासाठी मीरा-भार्इंदरमधील मतदारांची धावपळ सुरू आहे. शिवसेनेने भाजपाला लक्ष्य करीत त्यांची आश्वासने गोल गोल असल्यावर भर दिला आहे, तर भाजपाने मलिष्काच्या झोल झोलमधून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न चालवला आहे.
मीरा-भार्इंदरमध्ये गेल्यावेळी दोन वॉर्डांचा एक प्रबाग होता. यावेळी चार वॉर्डांचा एक प्रभाग झाल्याने मतदारसंघाचा आकार दुप्पट आणि सुट्ट्यांचा माहोल यामुळे मतदारांना गाठण्यात उमेदवारांची दमछाक होते आहे. २० ते ३५ हजारांपर्यंत मतदारसंख्या प्रत्येक प्रभागात आहे. त्यातच उमेदवारी उशिरा ठरल्याने १२ दिवसांत इतक्या मोठ्या प्रभागात सर्वत्र पोचणे उमेदवारांना अवघड जात आहे.
अर्ज माघारीचा शनिवारचा दिवस सरताच प्रचाराला जोर चढला. शनिवार, रविवारसोबत सोमवारीही रक्षाबंधनची सुट्टी असल्याने उमेदवारांनी मतदारांना घरोघरी जाऊन गाठण्याचा प्रयत्न केला. ज्या शाळांची तिमाही परीक्षा सुरु आहे, ते मतदार सुट्या असूनही घरीच सापडले; तर उरलेल्या मतदारांनी मात्र नातलगांकडे किंवा सुट्टीची मजा घेण्यासाठी नजिकची पर्यटनस्थळे गाठल्याचे दिसून आले.
पालिका निवडणुकीसाठी २० आॅगस्टला मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचारातील पहिला रविवार त्यांनी कारणी लावला. कारण त्यांना पुढचा आणखी एकच रविवार मिळणार आहे. त्यातही पुढच्या आठवड्यात दुसरा शनिवार, रविवार, स्वातंत्र्यदिनाची सुट्टी, पतेतीची सुट्टी आहे. त्यामुळे सोमवार आणि बुधवारची सुट्टी टाकल्यास पुन्हा लाँग वीकएण्ड पदरी पडणार असल्याने उमेदवारांची धास्ती वाढली आहे.
निवडणूकमॅनेजमेंट एजन्सींची मदत
प्रभागातील प्रत्येक घरी जाणे शक्य नसल्याने बहुतांश उमेदवारांनी प्रचार यंत्रणा राबवणाºया निवडणूकमॅनेजमेंट एजन्सींची मदत घेतली आहे. राज्यात सध्या कुठे निवडणूक नाही. तसेच नजिकच्या काळातही ती नसल्याने राज्यभरातील जवळपास ५० एजन्सींचे पथक शहरात तळ ठोकून आहे.
मतदारयादी सॉफ्टवेअर, मतदार स्लिप, प्रभाग सर्वेक्षण, बल्क मेसेज, व्हॉईस कॉल आदींसाठी प्रभागातील चौघा उमेदवारांच्या एका पॅनलसाठी या एजन्सी चार ते आठ लाखांचे पॅकेज देत आहेत. शिवाय फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आदी सोशल मीडियावरही प्रचार करण्यासाठी मजकूर, व्हिडीयो क्लिप बनवून दिली जात आहे. पथनाट्य तयार केले जात आहे.
या शिवाय डिजिटल एलईडी व्हॅन, स्लिप कंडक्टर मशीननाही मागणी आहे. सॉफ्टवेअरसह स्लिप कंडक्टर मशीनसाठी साडेतेरा हजारांचा खर्च आहे. यात मतदाराच्या घरी प्रचार करताना या मशीनमधून मतदाराची माहिती, मतदान केंद्र, उमेदवाराचे चिन्ह आदी सर्व माहितीची एकत्र स्लिप दिली जाते. नुसता ब्लू टुथ प्रिंटरही सहा हजार रुपयात उपलब्ध करुन दिला जात आहे.
प्रचार साहित्याची दुकाने
निवडणुकीसाठीचे झेंडे, बिल्ले, मफलर आदींनाही मागणी आहे. पक्षांचे चिन्ह असलेल्या कपाळाला लावण्याच्या पट्ट्या, गळ््यात घालण्याच्या पट्ट्या, टोप्याही जागोजाग दिसत आहे. शहरात जागोजागी निवडणूक साहित्याची दुकाने थाटली गेली आहेत. शिवाय पक्षांतर्फेही साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.

खर्चावरून वादावादी : एका प्रभागात चारचे पॅनल असल्याने चौघा उमेदवारांमध्ये नेमके पॅकेजमध्ये काय घ्यायचे, हा वादाचा मुद्दा बनतो आहे. ‘मला हे नको, मग मी त्याचे पैसे का देऊ,’ ‘याचे पॅकेज महाग आहे दुसºयाचे स्वस्त आहे,’ आदी मुद्द्यांवरुन खडाजंगी सुरु झाली आहे.

अमूक गोष्टीसाठी मी आधीच खर्च केला आहे. पुन्हा पॅकेजमध्ये त्याच गोष्टीसाठी मी पैसे देणार नाही, असे उमेदवार सांगत आहेत. त्यामुळे पैशांच्या वाटणीवरूनही वादावादी सुरु झाली असून त्याचा परिणाम प्रचारावर होण्याची चिन्हे आहेत.

उमेदवारांच्या या वादात निवडणूक मॅनेजमेंटचे काम करणाºया एजन्सींना पैसे बुडण्याची धास्ती वाटते आहे. त्यामुळे काम सुरु करण्याआधीच निम्मी रक्कम आगाऊ घेतली जात आहे. त्यामुळे फारसे नुकसान होत नसल्याचे एका एजन्सीच्या प्रतिनिधीने सांगितले.

डिजिटल
प्रचारावर भर
उमेदवारांचा कल डिजिटल व सोशल प्रचारावर जास्त आहे. प्रचारासाठी फारच कमी कालावधी मिळाल्याने घरोघरी जाणे उमेदवारांना शक्य नाही. त्यामुळे निवडणूक मॅनेजमेंट एजन्सींकडे त्यांचा कल आहे.
- शुभम घाडगे, निवडणूक मॅनेजमेंट एजन्सीचे प्रतिनिधी

पॅकेज न परवडणारे
प्रचाराचे पॅकेज आमच्यासारख्या सर्वसामान्य उमेदवारांना परवडणारे नाही. प्रभागात चार मजल्याच्या ५०८ इमारती आहेत. आम्ही घरोघरीच जाऊन प्रचार करत आहोत. एका दिवसात सुमारे ३५ इमारतींमध्ये जात आहोत. पत्रके छापून घेतली; पण सोशल मीडियासाठीचे प्रचार साहित्य कार्यकर्तेच तयार करत आहेत.
- हेतल परमार, उमेदवार

उमेदवारांनी देखील व्यक्तीगत प्रचारावर भर दिला आहे. एकाच पॅनल मध्ये असले तरी एकमेकांशी पटत नल्याने ठिकठिकाणी उमेदवार स्वत:चा एकट्याने प्रचार करताना दिसत आहेत. प्रचाराच्या नियोजना सह प्रचार साहित्य आदींवरुन उमेदवारां मध्ये वादावादी सुरु झाली आहे.

उमेदवार थकले
एका एका प्रभागात चार मजल्यांच्या बहुसंख्य इमारती आहेत, तर लिफ्ट असलेल्या ७ ते २१ मजल्यांच्या इमारतीही आहेत. पण चार मजली इमारतींचे प्रमाण जास्त आहे. एका एका प्रभागात तब्बल ३०० ते ५०० अशा इमारती असल्याने मतदारांना प्रत्येक इमारतींत जाऊन भेटणे अवघड बनले आहे. उमेदवारांची व सोबतच्या कार्यकर्त्यांची त्यात चांगलीच दमछाक होते आहे. चढ-उतार करुन उमेदवारांना धाप लागणे, पाय सुजणे, चक्कर येणे आदी प्रकार घडत असल्याचे किस्से ऐकू येत आहेत. अनेक ठिकाणी उमेदवार आळीपाळीने इमारतींमध्ये जाऊन प्रचार करत आहेत. त्यापेक्षा झोपडपट्ट्या किंवा गावठाणांमध्ये प्रचार करणे उमेदवारांना सोपे जात आहे.

सोशल मीडियावर भर

उमेदवारांनी व्यक्तिगतरित्यादेखील व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक आदी सोशल मीडियावर भर दिला आहे. प्रचाराचे किंवा विविध कामांचे फोटो, आश्वासने, आवाहने टाकली जात आहेत. पण आर्थिकदृष्ट्या कमकुवत उमेदवारांची अडचण झाली आहे. लाखा-लाखांची पॅकेज शक्य नसल्याने त्यांनी जमेल तसा कार्यकर्त्यांसोबत घरोघरी प्रचार सुरु केला आहे.

Web Title:  BJP round table, Shiv Sena Jhol Jhol, Mira Bhaindar started to propagate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.