भाजपावर उठली टीकेची झोड, वाढदिवसाच्या पार्टीवरून सेना, काँग्रेसचा संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 03:27 AM2018-08-13T03:27:08+5:302018-08-13T03:27:29+5:30
काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांशी लढताना मेजर कौस्तुभ राणे शहीद झाले. राणे हे मीरा रोडमध्ये राहत होते. त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर भाजपा नगरसेवकाचा वाढदिवस साजरा झाला.
मीर रोड : काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांशी लढताना मेजर कौस्तुभ राणे शहीद झाले. राणे हे मीरा रोडमध्ये राहत होते. त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर भाजपा नगरसेवकाचा वाढदिवस साजरा झाला. त्यानिमित्ताने झालेल्या पार्टीत जल्लोष करण्यात आला. पार्टी करून शहीद जवानांची क्रूर चेष्टा करायची आणि आता सहानुभूतीचा बेगडी पुळका आणायचा, अशा शब्दात भाजपावर शिवसेना, काँग्रेसने टीका केली आहे.
महापौर डिम्पल मेहता यांनी शहीद राणे यांचे आमदार निधीतून स्मारक, पालिका वास्तूला त्यांचे नाव देणे, मुलाला पालिकेतून शिष्यवृत्ती व कुटुंबातील सदस्याला पालिकेची नोकरी देण्याचे प्रसिद्धिपत्रक काढले आहे. मंगळवारी सकाळी मेजर कौस्तुभ शहीद झाल्याची बातमी येताच राणे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. कौस्तुभ यांच्यासह तीन जवानांनी देशासाठी दिलेल्या प्राणाच्या आहुतीबद्दल मीरा रोडच नव्हे, तर देशभरात शोक व्यक्त होत असताना शहीद राणे यांच्या शीतलनगरमधील घरापासून जवळच सेंट पॉल शाळेसमोर त्याच मंगळवारी रात्री आमदार नरेंद्र मेहता, महापौर डिम्पल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती आदी भाजपा नगरसेवक आनंद मांजरेकर यांच्या बर्थडे पार्टीत रंगले होते.
भाजपाचे नगरसेवक अनिल विराणी, मनोज दुबे, दिनेश जैन, प्रशांत दळवी, दौलत गजरे, नगरसेविका हेमा बेलानी, दीपिका अरोरा, वंदना भावसार, हेतल परमार, अनिता मुखर्जी, वनिता बने, निलेश सोनी, सोनिया नायक, काजल सक्सेना, किरण चेऊलकर, सुरेश दुबे आदी अनेक पदाधिकारी व कार्यकर्तेही वाढदिवसाच्या पार्टीचा जल्लोष करत होते. यावरून भाजपावर टीकेची झोड उठली आहे. सुरुवातीला आम्हाला याची माहिती नव्हती. जेव्हा समजले तेव्हा बंद केले, असा सूर त्यांनी लावला. नंतर, मात्र चूक झाली, दिलगिरी व्यक्त करतो, असे मेहता व मांजरेकर यांच्याकडून सांगण्यात आले. पण, मंगळवारी दुपारनंतर स्वत: मेहता व काही नगरसेवक शहीद राणे यांच्या घरी गेले होते.
त्यामुळे कोणाला माहिती नव्हती वगैरे केवळ कांगावा केला जात असल्याचे उघड झाले. मेहतांना माहिती असताना त्यांनी वाढदिवसाचा कार्यक्रम रद्द करायला सांगितले नाही, उलट तेथे जाऊन केक खाल्ला.
दरम्यान, शिवसेनेचा पेणकरपाडा येथे बुधवारी होणारा कार्यकर्ता मेळावा कौस्तुभ हे शहीद झाल्याचे कळताच रद्द करण्यात आला. तर, अन्य काहींनी वाढदिवस आदी कार्यक्रम रद्द केल्याचे जाहीर केले.
गुरुवारी सायंकाळी महापौर मेहता यांनी तर दोन पानी प्रसिद्धिपत्रक काढून मीरा रोड स्थानकासमोरील चौकात मेहतांच्या निधीतून शहीद राणे यांचे स्मारक उभारणार, पालिकेच्या वास्तूला त्यांचे नाव देणार, त्यांच्या कुटुंबीयांनी तयारी दर्शवली तर मुलाच्या शिक्षणाचा खर्च पालिका करेल, कुटुंबातील सदस्याला पालिकेत नोकरी देऊ, असे म्हटले आहे.
पालिका व मी सदैव शहीद कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहीन, असेही महापौरांनी स्पष्ट केले आहे. परंतु, बर्थडे पार्टीबद्दल मात्र अवाक्षर काढलेले नाही.
वाढदिवसाच्या पार्टीवरून शहरात वातावरण चांगलेच तापले असून यातून कदाचित नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
मेजर कौस्तुभ यांच्या सन्मानासाठी सेना समर्थ
देशासाठी शहीद झालेल्या मेजर कौस्तुभ यांचे पार्थिव कधी येईल, याकडे त्यांचे कुटुंब व सर्व नागरिक डोळे लावून बसले असताना आमदार, महापौर व नगरसेवक पार्ट्या झोडतात, यापेक्षा शरमेची बाब कोणती, असे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक म्हणाले. शहीद जवानांचा अपमान करणाºया असल्या आमदाराचा निधीसुद्धा शहीद स्मारकासाठी वापरणे देशभक्त नागरिक सहन करणार नाही. शहीद कौस्तुभ यांचा सन्मान आणि त्यांच्या कुटुंबीयांचा स्वाभिमान जपण्यासाठी देशभक्त नागरिक व शिवसेना समर्थ आहे, असे ते म्हणाले.\
लाज वाटत असेल, तर राजीनामे द्यावेत
काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांनीही भाजपाच्या बर्थडे पार्टीचा निषेध केला आहे. शहीद व त्यांच्या कुटुंबीयांसह देशाचा अपमान करणाºया आमदार, महापौर, उपमहापौर व नगरसेवक, पदाधिकाºयांना जरा तरी लाज वाटत असेल, तर त्यांनी राजीनामे द्यावेत, असे सावंत म्हणाले.