"मनुस्मृतीवरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाचे जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलन"

By नितीन पंडित | Published: May 31, 2024 03:49 PM2024-05-31T15:49:07+5:302024-05-31T15:49:34+5:30

मनुवादी विचाराच्या भाजपाच्या भूलथापांना बहुजन समाज बळी पडणार नाही - अॅड. किरण चन्ने

BJP s agitation against Jitendra Awhad to divert attention from Manu smriti kiran channe commented | "मनुस्मृतीवरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाचे जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलन"

"मनुस्मृतीवरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाचे जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलन"

भिवंडी: "मनुस्मृती ग्रंथातील श्लोकांचा शालेय पाठ्यपुस्तकात समावेश करण्याचा घाट भाजपाने घातला असून त्यास विरोध करताना अनवधानाने जितेंद्र आव्हाड यांच्या कडून बाबासाहेबांचा फोटो फाडला गेला. त्यांचा हेतू मनुस्मृतीला विरोध करण्याचा होता. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली असताना भाजपा जाणूनबुजून मनुस्मृती वरून लक्ष विचलित करण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन करून बहुजन समाजाला फसवण्याचे काम करीत आहे," अशी टीका आरपीआय सेक्युलर पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अॅड.किरण चन्ने यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश व जितेंद्र आव्हाड प्रकरण या बाबत पक्षाची भूमिका विषद करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी शहर युवा अध्यक्ष प्रदिप गायकवाड, तालुका युवा अध्यक्ष अजिंक्य गायकवाड, कार्याध्यक्ष विजय भोईर, विभाग प्रमुख अमोल तपासे, देविदास भोईर, रोशन गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मनुस्मृती हा ग्रंथ चातुर्वर्ण्य व्यवस्था अधोरेखित करणारा, स्त्रियांना हिन लेखणारा व समाजातील जाती व्यवस्था भक्कम करणारा ग्रंथ आहे. म्हणूनच बाबासाहेबांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले होते. त्याच ग्रंथातील काही श्लोक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा घाट भाजपाकडून सुरू केला आहे. त्याला विरोध करण्याची भूमिका जितेंद्र आव्हाड यांची होती. त्यावेळी अनवधानाने बाबासाहेबांचे पोस्टर त्यांच्या कडून फाडले गेले, त्याचा बाऊ करून भाजपा मनुस्मृती वरील लक्ष विचलित करण्यासाठी करीत असलेले आंदोलन हा फार्स आहे. जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली असून त्यांचा हेतू मनुस्मृतीला विरोध करण्याचा होता, बाबासाहेबांचा अपमान करण्याचा नसल्याने अमच्यासह असंख्य आंबेडकरवादी जनता जितेंद्र आव्हाड यांच्या सोबत राहील असा विश्वास अॅड किरण चन्ने यांनी व्यक्त केला आहे.

आर एस एस ने १९४८ मध्ये दिल्ली येथे बाबासाहेबांचा पुतळा जाळण्याचा प्रकार केला होता. संविधान जाळले होते हे विचारपूर्वक केलेले कृत्य होते. त्याबाबत भाजपा काही भूमिका व्यक्त करणार आहे का? असा सवाल उपस्थित करीत मनुस्मृतीचा अभ्यासक्रमातील समावेश हा संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वांविरोधात असून त्याचा समावेश करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात आम्ही प्रखर आंदोलन करू व जितेंद्र आव्हाड यांच्या पाठीशी उभे राहू अशी भूमिका किरण चन्ने यांनी शेवटी व्यक्त केली.

Web Title: BJP s agitation against Jitendra Awhad to divert attention from Manu smriti kiran channe commented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.