‘भाजपा रा. स्व. संघाला अजिबात जुमानत नाही’
By admin | Published: July 26, 2016 04:47 AM2016-07-26T04:47:20+5:302016-07-26T04:47:20+5:30
रा. स्व. संघ सांगेल ते भारतीय जनता पार्टी ऐकते हे देशातील प्रसारमाध्यमांनी दाखवलेले चित्र असले तरी ते व्यवहार्य नाही, असे वक्तव्य संघाचे प्रसिद्धीप्रमुख प्रमोद बापट यांनी करीत सत्ताधारी
बदलापूर : रा. स्व. संघ सांगेल ते भारतीय जनता पार्टी ऐकते हे देशातील प्रसारमाध्यमांनी दाखवलेले चित्र असले तरी ते व्यवहार्य नाही, असे वक्तव्य संघाचे प्रसिद्धीप्रमुख प्रमोद बापट यांनी करीत सत्ताधारी भाजपा संघाला जुमानत नसल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे संघाचे स्वयंसेवक असल्याने संघाच्या कार्यक्रमांना आणि कार्यालयाला भेटी देतात. मात्र याचा अर्थ भाजपाचा संघाशी संबंध आहे, असा होत नाही, असा जुना सूर बापट यांनी आळवला. देशात आणि काही राज्यांमध्ये भाजपाची सरकारने आल्यापासून प्रसारमाध्यमांनी संघाकडे गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केली, असेही ते म्हणाले.
संघाची प्रतिमा लोकांपर्यंत नेणार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लवकरच नव्वद वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने संघाचे काम आणि त्याचा खरा चेहरा, खरी प्रतिमा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचेही बापट यांनी सांगितले. केंद्र व राज्यातील भाजपा सरकारमधील अनेक मंत्री भ्रष्टाचार व बेलगाम वक्तव्यामुळे अडचणीत आल्याने संघाने आपला त्याच्याशी दूरान्वये संबंध नसल्याचे भासवण्याची मोहीम हाती घेतल्याचे बोलले जात आहे.
बदलापूरच्या आदर्श शाळेत रा. स्व. संघातर्फे शहरातील ज्येष्ठ नागरिक, साहित्यिक, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी बापट यांनी संवाद साधला. या कार्यक्र माला बदलापूरचे उपनगराध्यक्ष श्रीधर पाटील, शाम जोशी आणि विविध ठिकाणांहून आलेले संघाचे व भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.