उल्हासनगरात भाजप-शिंदेसेनेचे वितुष्ट कायम ; शिंदेसेनेची सोमवारी रात्री होणार बैठक
By सदानंद नाईक | Published: November 4, 2024 07:54 PM2024-11-04T19:54:44+5:302024-11-04T19:55:08+5:30
शिंदेसेनेची सोमवारी रात्री याबाबत बैठक असल्याची माहिती राजेंद्र चौधरी यांनी दिली.
उल्हासनगर : भाजप शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री याच्याबाबत अपशब्द काढल्याच्या निषेधार्थ शिंदेसेनेने महायुतीच्या मेळाव्यावर बहिष्कार टाकला. त्यानंतर रामचंदानी व मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलीगिरी व्यक्त केल्यानंतरही भाजप-शिंदेसेनेचे वितुष्ट कमी झाले नसून शिंदेसेनेची सोमवारी रात्री याबाबत बैठक असल्याची माहिती राजेंद्र चौधरी यांनी दिली.
उल्हासनगर मतदारसंघातून महायुतीकडून भाजपचे कुमार रिंगणात उतरले आहेत. लोकसभा निवडणूकीतील कलानी व शिंदेसेनेच्या दोस्तीला तिलांजली देऊन शिंदेसेनेचे पदाधिकारी आयलानी यांच्या पाठीमागे उभे ठाकले. मात्र भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री यांच्याबाबत अपशब्द काढल्याने शिंदेसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले. रविवारी टाऊन हॉल मध्ये पार पडलेल्या महायुतीच्या मेळाव्यावर बहिष्कार टाकून याबाबत जाब विचारण्यात आला. तसेच टाऊन हॉल परिसर घोषणाबाजीने दनाणून सोडला. भाजपचे नेते व मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री यांच्याबाबत पक्ष पदाधिकाऱ्यांनी काढलेल्या अपशब्द बाबत दिलगिरी व्यक्त केली. तसेच भाजपा शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनीही माफी मागितली. मात्र शिंदेसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक आयलानी यांच्या प्रचार कार्यक्रमात सोमवारी पोहचले नाही.
शिंदेसेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांनी भाजप व शिंदेसेनेतील वाद सोडविण्यासाठी सोमवारी रात्री पक्ष पदाधिकऱ्याची बैठक बोलाविली. अशी माहिती महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली. लांगडे यांनी बोलाविलेल्या पदाधिकाऱ्याच्या बैठकीत काय निर्णय होते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप व शिंदेसेनेचे मनोमिलन होणार काय? असा प्रश्नही विचारला जातो. आयलानी यांच्या दिवसभराच्या कार्यक्रमात शिंदेसेनेचा एकही पदाधिकारी सोमवारी फ़िरकला नसल्याने, वेगळायचं चर्चेला ऊत आला.
उल्हासनगरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी असहकार्यांची भूमिका घेतल्यास, आम्हाला शिंदेसेनेच्या दुसऱ्या मतदारसंघात असहकार्यांची भूमिका घ्यावी लागेल. असा अप्रत्यक्ष दम भाजप पदाधिकारी आपसात चर्चा करताना शिंदेसेनेला देत आहेत. एकूणच भाजप-शिंदेसेनेत वितुष्ट कायम असल्याचे उघड झाले.