भाजपा-शिवसेनेत पुन्हा फ्री-स्टाइल
By admin | Published: July 17, 2017 12:57 AM2017-07-17T00:57:59+5:302017-07-17T00:57:59+5:30
मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचे बिगुल शनिवारी वाजले. भारतीय जनता पार्टी व शिवसेना या राज्याच्या सत्तेतील
राजू काळे/धीरज परब ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भार्इंदर/मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचे बिगुल शनिवारी वाजले. भारतीय जनता पार्टी व शिवसेना या राज्याच्या सत्तेतील दोन पक्षांमध्येच मुख्यत्वे लढत होण्याचे संकेत गेल्या काही दिवसांमधील घडामोडींमुळे प्राप्त झाले आहेत.
भिवंडीत उत्तम यश मिळवणाऱ्या काँग्रेसची कामगिरी कशी राहील आणि राष्ट्रवादी काँग्रेसची किती पडझड होईल, याचेही औत्सुक्य आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यावर प्रत्यक्ष प्रचाराकरिता जेमतेम १५ दिवस मिळणार आहेत. मुंबईत निवडणुकीची घोषणा होताच महापालिका प्रशासनाने राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची दालने ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू केली. तसेच नगरसेवकांना देण्यात आलेले टॅबही जमा करण्याचे आदेश काढण्यात आले. महापालिका निवडणुकीत भाजपाच्या प्रचाराची सूत्रे ही आमदार नरेंद्र मेहता यांच्याकडे राहणार असून शिवसेनेची धुरा आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे राहणार आहे. अलीकडेच परिवहन समितीच्या कंत्राटदाराला मेहता यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फत अटक करवून दिली. त्यामुळे भाजपा-शिवसेना या दोन मित्रपक्षांमध्ये तू तू मैं मैं सुरू झाले. दोन्ही पक्षांमध्ये कशी रस्सीखेच पाहायला मिळेल, याची चुणूक यापूर्वीच मतदारांना दिसली आहे. भाजपा व शिवसेनेत इनकमिंग सुरू होईल आणि तेथेच मातब्बर उमेदवारांना खेचण्याकरिता दोन्ही पक्षांमध्ये स्पर्धा होईल.