जलकुंभ उद्घाटनावरुन भाजपा-शिवसेनेत राडा, धक्काबुक्कीने तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 03:35 AM2018-03-19T03:35:59+5:302018-03-19T03:35:59+5:30
मीरा रोडच्या शांतीनगर भागातील पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनादरम्यान भाजपा आणि शिवसेनेत राडा झाला. महिला नगरसेविका व कार्यकर्त्यांची आपापसात धक्काबुक्की, मारामारी झाल्याने तणावाचे वातावरण होते.
मीरा रोड : मीरा रोडच्या शांतीनगर भागातील पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनादरम्यान भाजपा आणि शिवसेनेत राडा झाला. महिला नगरसेविका व कार्यकर्त्यांची आपापसात धक्काबुक्की, मारामारी झाल्याने तणावाचे वातावरण होते. पोलिसांचा मोठा ताफा आल्यावर वाद आटोक्यात आला. यात शिवसेनेच्या नगरसेविका जखमी झाल्या असून त्यांना पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मीरा रोडच्या शांतीनगर प्रभाग २० मध्ये भाजपाचे दिनेश जैन, अश्वीन सोदरिया, हेतल परमार असे तीन, तर शिवसेनेच्या दिप्ती भट या एक असे चार नगरसेवक आहेत. भट या भाजपातून शिवसेनेत आल्याने त्यांच्यावर भाजपा नेतृत्त्वाचा रोष असल्याचे सांगितले जाते. या आधीही या प्रभागात जलवाहिनी टाकणे, उद्यानाचे उद्घाटन, रस्ता डांबरीकरणाचे भूमिपूजन आदी अनेक विषयांवरुन वाद उफाळून आले. सेक्टर २ च्या मैदानात पालिकेने बांधलेल्या एक दशलक्ष लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन गुढीपाडव्यादिवशी ठेवण्यात आले होते. परंतु पालिकेने त्यासाठी निमंत्रण पत्रिका वगेरे काढली नव्हती. पण उद्घाटनाच्या ठिकाणी सर्व व्यवस्थेसह पालिका अधिकारी उपस्थित होते. तेथे पालिकेने बाऊन्सर ठेवले होते.
भाजपाने पाण्याची टाकी आमदार नरेंद्र मेहता, महापौर डिंपल मेहता व भाजपामुळे झाल्याची जाहिरातबाजी सोशल मीडियावर चालवली होती. परिसरात पत्रकेही वाटली होती. भट यांनीही या कामासाठी पाठपुरावा केल्याने काम पूर्ण झाल्याचा दावा करत बॅनर लावला होता.
पालिकेने रितसर निमंत्रण पत्रिका न काढताच शिवसेनेच्या खासदार, आमदारांना डावलून केवळ भाजपा आमदारालाच व भाजपालाच झुकते माप दिल्याची टीका करत शिवसेनेने संताप व्यक्त केला होता. भट यांनी लावलेला बॅनर काढायला लावल्याने वादाची ठिणगी पडली.
भट यांच्यासह शिवसेनेच्या उपजिल्हा संघटक स्रेहल सावंत यांच्यासह काही महिलांनी बॅनर काढण्यावरुन प्रभाग अधिकारी नरेंद्र चव्हाण यांना जाब विचारला. त्यानंतर भट, महिला व परिसरातील रहिवाशांसह टाकीजवळ गेल्या. शहर अभियंता शिवाजी बारकुंड यांनाही भट यांनी विचारणा केली. महापौरांनी उद्घाटन करावे, याबद्दल माझी हरकत नाही. तो त्यांचा अधिकार असल्याचे सांगत भट यांनी आमच्या खासदार, आमदारांना का डावलता, असा सवाल केला. उपस्थित रहिवाशांनीही भट यांनी टाकीचे काम केले असे सांगत अन्य कोणी श्रेय घेऊ नये, असे सांगू लागले. बोलाचाली वाढताच शिवसेनेच्या महिलांनी रहिवाशांसह उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला. त्यांना भाजपा नगरसेवक प्रशांत दळवी, नगरसेविका परमार, नाईक, राय आदींसह बारकुंड यांनी अडवले. त्यामुळे धक्काबुक्की सुरु झाली. दुसरीकडे सेनेच्या महिलांनी जलकुंभाच्या खांबांवर नारळ फोडले. स्थानिक वृध्द महिलेने टाकीचा नळ उघडला. त्यावरुन भाजपा व सेनेत राडा सुरु झाला. लाथा व धक्काबुक्की तसेच आरडाओरडा व घोषणाबाजी सुरु झाली. महिलांमध्ये जुंपली.
नयानगर पोलिसांचा ताफा कार्यक्रमस्थळी आल्यानंतर नगरसेवक सोडून सर्वांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर महापौर डिंपल मेहता आल्या. त्यांनी जलकुंभाचे उद्घाटन केले. या वेळी उपमहापौर चंद्रकांत वैती, विरोधी पक्षनेते राजू भोईर, दिप्ती भट, हेतल परमार, अश्विन कासोदरिया, दिनेश जैन आदी नगरसेवक उपस्थित होते.
>गुन्ह्याची प्रक्रिया सुरू
भट यांच्या अंगावर ओरबाडल्याच्या जखमा तसेच डोक्यासह विविध ठिकाणी मुका मार लागल्याने त्यांना जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी भट यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले.