भाजपा - शिवसेना आमदारांमध्ये चांगलीच जुंपली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 12:13 AM2018-12-11T00:13:01+5:302018-12-11T00:13:28+5:30
सरनाईकांच्या प्रभागात मेहतांची कारवाई, शिवसैनिक संतप्त
मीरा रोड : हाटकेश भागातील औद्योगिक वसाहती तोडण्याच्या मुद्यावर भाजप आणि सेनेच्या आमदारांमध्ये सोमवारी जुंपली. शिवसेनेचे आ. प्रतापराव सरनाईक यांच्या प्रभागात भाजपाचे आ. नरेंद्र मेहता यांच्या उपस्थितीत महापालिका अधिकाऱ्यांनी कारवाई केल्याने हा वाद उद्भवला. दोन्ही आमदार एकमेकांसमोर उभे ठाकल्याने तणाव वाढला होता. यावेळी झालेल्या दगडफेकीने कारवाईसाठी आणलेल्या पोकलेनची काच फुटली. तणाव वाढताच आमदार नरेंद्र मेहता यांनी काढता पाय घेतला आणि पालिकेने कारवाई गुंडाळली.
महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सोमवारी सकाळपासून हाटकेश भागातील औद्योगिक वसाहतीत कारवाई सुरु केली. पालिकेने बळजबरी पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरु केल्याचा आरोप उद्योजकांनी आ. सरनाईकांजवळ केला. माझ्या मतदारसंघात दुसरा आमदार सांगेल त्याप्रमाणे वाट्टेल ते कराल तर खपवून घेणार नाही, असे सरनाईक यांनी पालिका अधिकाºयांना बजावले. आ. सरनाईकांचा रोष पाहून शिवसैनिकही संतापले. आ. सरनाईक स्वत: पोकलेनसमोर उभे झाल्यानंतर अधिकाºयांनी कारवाई थांबवली. मात्र त्यामुळे काही वेळ तणाव झाला होता.
मारहाण व खोटे आरोप करणे हेच शिवसेनेचे काम आहे. भाजपा विकासाचे काम करते. ठाण्यात मोठ्या प्रमाणात रस्ते तोडले, तर सरनाईक काय बिल्डरांकडून पैसे घेऊन रिक्शावाला ते अरबपती बनले आहेत का ? आ. सरनाईकांनी केलेला प्रकार निंदनीय आहे.
- नरेंद्र मेहता, आमदार, भाजपा
आ. नरेंद्र मेहता यांना काय आरोप करायचे ते करु देत; मात्र शिवसेना त्यांचे कोणतेही आरोप खपवून घेणार नाही, हे त्यांनी समजून घ्यावे. आ. नरेंद्र मेहता ही काय व्यक्ती आहे ते संपूर्ण शहराला माहीत आहे. ते मी वेगळ््याने सांगण्याची गरज अजिबात नाही.
- आ. सरनाईक, आमदार, सेना