महायुतीसाठी भाजपा शिवसेनेच्या कोर्टात? राजकारण तापले : थळेंचा राजीनामा पडणार पथ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 03:00 AM2017-09-08T03:00:01+5:302017-09-08T03:00:13+5:30
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी नुकतेच आरक्षण जाहीर झाल्याने ग्रामीण भागात राजकारण तापायला सुरूवात झाली आहे
पंढरीनाथ कुंभार
भिवंडी : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी नुकतेच आरक्षण जाहीर झाल्याने ग्रामीण भागात राजकारण तापायला सुरूवात झाली आहे, पण ज्यापद्धतीने गट-गणांची रचना बदलली आहे, ते पाहता ही निवडणूक सोपी राहिलेली नाही. ग्रामीण भागातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्त्वाला शह द्यायचा असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक भाजपा, शिवसेना व रिपब्लिकन पक्षाच्या महायुतीने लढवावी, अशी भूमिका घेत भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी शिवसेनेला सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे.
भाजपाच्या नेत्यांनीही या महायुतीला परवानगी द्यावी, यासाठी पाटील प्रयत्नशील आहेत. त्यातच शिवसेनेचे तालुकाप्रमुख विश्वास थळे यांनी राजीनामा दिल्याने ते भाजपाच्या पथ्यावर पडल्याचे बोलले जाते.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीवेळी शिवसेनेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळवण्यासाठी खासदार पाटील यांनी तालुकाप्रमुख विश्वास थळे यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यास सांगितले. परंतु निवडणूक कार्यक्रमाच्या अंतिम क्षणापर्यंत हा निर्णय झाला नाही. उलट ग्रामीण भागात राजकीय अफवांना ऊत आला आणि शिवसेना-भाजपाचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले. परिणामी दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणास लागली. भाजपाला एकाकी पाडण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आले. भाजपाची कोंडी होऊ द्यायची नसल्याने पाटील यांनी समयसूचकता दाखवत जि.प., पंचायत समिती निवडणुकीत महायुती करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, प्रकृती अस्वास्थ्यामुळे थळे यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी गेल्या ३० वर्षापेक्षा जास्त काळ पक्षाची बांधणी केली आहे. जि. प., पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसला तरी निवडणूक आयोगाने आरक्षण जाहीर केले आहे. ऐन निवडणुकीच्यापूर्वीच थळे यांनी राजीनामा दिल्याने निवडणुकीवर परिणाम होईल, अशी शिवसेनेत चर्चा आहे. तसेच या जागी कुणाची वर्णी लागणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
‘आधी गट-गट रचनेवर भर’
शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्याशी महायुतीबाबत चर्चा केली असता त्यांनी सांगितले,‘तालुक्यातील जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समितीचे गण यांची रचना बदललेली असल्याने त्यावर अनेक कार्यकर्त्यांनी हरकती दाखल केल्या आहेत. प्राथमिक स्तरावर या रचनेबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी आमचे प्रयत्न
सुरू आहे. त्यानंतरच
महायुती व त्यामधील जागावाटपाबाबत निर्णय घेणे शक्य होणार आहे.’
विकासकामांसाठी महायुती गरजेची-
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीबाबत खासदार कपिल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपा, शिवसेना व रिपब्लिकन पक्षाच्या महायुतीने ही निवडणूक लढवावी,असे आमचे प्रयत्न आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेवर महायुतीचे वर्चस्व निर्माण होऊन विकासकामे करता येतील. यासाठी आम्ही अनुकूल भूमिका घेतली असून त्यासाठी सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा,असे आवाहन केले आहे. याबाबतचे चित्र लवकरच स्पष्ट होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
युती न करण्याची शिवसेनेची भूमिका कायम?
राज्यात यापुढे कोठेही भाजपाशी युती करणार नसल्याची घोषणा शिवेसनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी केली होती. तो निर्णय पक्षाने आजवर पाळला. भाजपापेक्षा त्यांनी काँग्रेसला प्राधान्य दिले. त्यामुळे आता जरी भाजपाने महायुतीसाठी पुढाकार घेतला असला तरी गट-गटांच्या रचनेचे कारण देत शिवसेनेने त्याला प्रतिसाद दिलेला नाही.
मीरा-भार्इंदर पालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने दिलेला युतीचा प्रस्ताव भाजपाने फेटाळल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर भाजपाशी युती न करण्यावर सेना कायम राहते का ते लवकरच स्पष्ट होईल.