भाजपा शिवसेनेत का रे दुरावा..!
By admin | Published: November 26, 2015 01:45 AM2015-11-26T01:45:51+5:302015-11-26T01:45:51+5:30
राज्यातील सत्तेत भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्याची आपली अलीकडेच सुरु केलेली परंपरा कायम राखली.
भिवंडी: राज्यातील सत्तेत भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्याची आपली अलीकडेच सुरु केलेली परंपरा कायम राखली. केवळ शिवसेनाच नव्हे तर काँग्रेस, समाजवादी पार्टी यांनीही कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांना टोले हाणताना विरोधाने शहराचा विकास होत नाही, असे उद्गार काढले.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वंजारपट्टीनाका येथे बांधलेल्या उड्डाणपुलाचे उद्घाटन आणि राजीव गांधी चौक ते कल्याण रोड, साईबाबा मंदिरापर्यंत होणाऱ्या उड्डाणपुलाचे भूमिपूजन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी संपन्न झाले. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीतील प्रचारात भाजपा व शिवसेनेत झालेल्या वाकयुद्धामुळे दोन्ही पक्षात निर्माण झालेली कटुता कमी झालेली नाही.
या कार्यक्रमाबाबत महापालिका प्रशासनास विश्वासात न घेतल्याचा ठपका महापौर तुषार चौधरी यांनी ठेवला व कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुभाष माने तसेच आमदार रुपेश म्हात्रे यांनी ‘हा उद्घाटनाचा कार्यक्रम शासकीय नसून भारतीय जनता पार्टीचा आहे असा शेरा मारला आहे.’
स्थायी समिती सभापती प्रशांत लाड यांनी ‘शहरात तीन एमएमआरडीए सदस्य असतांना एकालाही या कार्यक्रमाची पूर्वकल्पना दिली नसल्या बद्दल खंत व्यक्त केली.’ उप महापौर अहमद सिद्दिकी, काँग्रेसचे गट नेते जावेद दळवी व मनोज म्हात्रे यांनी ‘वंजार पट्टीनाका येथील उड्डाणपुलाला भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव देण्यासंदर्भात महापालिकेच्या महासभेत प्रस्ताव प्रलंबित असतांना हा कार्यक्रम घाईघाईने उरकण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असून त्याचा निषेध करतो.’ असे सांगितले.
मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणारे होर्डींग्ज शहर भाजपाकडून सर्वत्र लावण्यात आले असले तरी मित्र पक्ष शिवसेनेकडून तसे कोणतेही बॅनर किंवा पोस्टर्स लावलेले गेले नव्हते. तसेच भाजपाकडूनही सेनेच्या कोणत्या नेत्याला आपल्या पोस्टर्सवर स्थान दिले गेले नसल्याने ‘फे्रंडली फायर’चेच चित्र पहायला मिळाले.
(प्रतिनिधी)
अनिधकृत बांधकामे रोखलीच पाहिजेत
मुख्यमंत्री म्हणाले की, अनिधकृत बांधकामांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. एकीकडे ग्रामीण भागातून लोकांचे लोंढे शहराकडे येत आहेत आणि दुसरीकडे अनधिकृत बांधकामे पाडल्यानंतर त्यातून राहणाऱ्या नागरिकांचे कसे पुनवर्सन करावे हा प्रश्न पडला आहे.
पण हे आता थांबले पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत अनिधकृत बांधकामे रोखली गेली पाहिजे याकडे आम्ही
लक्ष देणार आहोत.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी भिवंडी शहरासाठी १०० एमएलडी अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेने दिलेल्या ५६८ कोटींच्या प्रस्तावाचा सुसाध्यता अहवाल पाहून तो केंद्राकडे त्वरीत मान्यतेसाठी पाठविण्यात येईल असे आश्वासन दिले तसेच कांजूर फाटा ते वंजारपट्टी या भिवंडीतील प्रमुख मार्गाचे कॉक्रि टीकरण करण्याच्या सुचना एमएमआरडीएला देण्यात येतील. रस्ते सुधारण्यासाठी आमदार महेश चौगुले यांना बजेटमधून १०कोटी रु पये अतिरिक्त देण्यात येतील, असे सांगितले.
राज्याला ६० टक्के सकल उत्पन
शहरातून मिळते मात्र शहरीकरणाचे फायदे नागरिकांना मिळत नाहीत. गेल्या काही वर्षांत आपल्या मानसिकतेमुळे आपण शहरांमध्ये योग्य आणि पुरेशा सुविधा देऊ शकलेलो नाही. आम्ही सत्तेवर आल्यानंतर ही परिस्थिती बदलण्यासाठी प्राधान्यक्र म ठरविला आहे. पिण्याच्या पाण्याचे नेटवर्क सुधारून पाण्याचे समन्यायी वाटप, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट, घनकचरा व्यवस्थापन, रोजगार या आघाड्यांवर आम्ही शहरांचा विकास करीत आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आज शहरातील मैला आणि सांडपाणी हा नदी-नाले- ओढे यांच्यात मिसळून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते.
हे स्त्रोत पुन्हा शुध्द करावे लागतील. २०१७ पर्यंत राज्यातील सर्व शहरे आणि गावे हागणदारीमुक्त झालीच पाहिजे असे उद्दीष्ट आम्ही ठेवले आहे.
एकूण ७७५ मीटर लांबीच्या वंजारपट्टी पुलाला नाशिक हायवे आणि दुसरीकडे शिवाजी चौकाकडे जाण्यासाठी दोन मार्गिका आहेत. यामुळे नाशिक आणि वाडाकडे जाणारी वाहतूक सुलभतेने होणार असून या भागातील उद्योग व्यवसायांना देखील याचा फायदा होणार आहे त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर होणारे प्रदूषण कमी होईल.