सेनेच्या धक्क्याने भाजपात नाराजी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 06:32 AM2018-04-16T06:32:44+5:302018-04-16T06:32:44+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत संख्याबळाच्या आधारे शिवसेना आणि भाजपाने सत्ता मिळविली असली तरी पदांच्या वाटपावरून अढी काही केल्या कमी होताना दिसत नाही. याचा प्रत्यय नुकत्याच पार पडलेल्या प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत आला. दहा प्रभागांमध्ये प्रत्येकी पाच-पाच सभापतीपदांचे सूत्र ठरलेले असतानाही क प्रभागात शिवसेनेने दिलेला धक्का भाजपाच्या जिव्हारी लागला आहे.

 BJP shocked by the shock! | सेनेच्या धक्क्याने भाजपात नाराजी!

सेनेच्या धक्क्याने भाजपात नाराजी!

Next

- प्रशांत माने
कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत संख्याबळाच्या आधारे शिवसेना आणि भाजपाने सत्ता मिळविली असली तरी पदांच्या वाटपावरून अढी काही केल्या कमी होताना दिसत नाही. याचा प्रत्यय नुकत्याच पार पडलेल्या प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत आला. दहा प्रभागांमध्ये प्रत्येकी पाच-पाच सभापतीपदांचे सूत्र ठरलेले असतानाही क प्रभागात शिवसेनेने दिलेला धक्का भाजपाच्या जिव्हारी लागला आहे. वरिष्ठांचे आदेश असतानाही शिवसेनेच्या स्थानिक राजकारणाने भाजपा नेते नाराज झाले असून महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपा सावध भूमिकेत राहणार आहे.
२०१५ ला केडीएमसीची निवडणूक पार पडली. यात शिवसेना ५३, भाजपा ४३, काँग्रेस ४, राष्ट्रवादी २ , मनसे ९, बसपा १, एमआयएम १ आणि अपक्ष ९ असे पक्षीय बलाबल आहे. निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेल्या शिवसेना भाजपाने संख्याबळाच्या आधारावर सत्ता स्थापन केली. सर्वात जास्त नगरसेवक निवडून आलेल्या शिवसेनेला पहिली अडीच वर्षे महापौर बसविण्याचा मान मिळविता आला, तर उर्वरित अडीच वर्षातील एक वर्ष भाजपा, तर दीड वर्षे शिवसेनेला मिळणार आहेत. १३ मे ला महापौरपदाचा शिवसेनेचा अडीच वर्षाचा कालावधी संपत आहे. पुढील मान भाजपाला आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महापौरपदाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या प्रभाग समितीच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपाला दिलेल्या अनपेक्षित धक्क्याने भाजपामध्ये अस्वस्थता पसरली आहे. शुक्रवारी दहा प्रभाग समित्यांच्या सभापतीपदाची निवडणूक झाली. क प्रभाग वगळता अन्य नऊ प्रभागांत शिवसेना-भाजपाच्या वतीने प्रत्येकी एका सदस्यानेच उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्या प्रभाग समिती सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध झाली. क प्रभागात भाजपाच्या वतीने सचिन खेमा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यात शिवसेनेचे मोहन उगले यांनीही उमेदवारी दाखल केल्याने चुरस वाढली.
दहा प्रभागांमध्ये प्रत्येकी ५ प्रभाग समित्या असे वाटप झाल्याने निवडणुकीच्या वेळी उगले अर्ज मागे घेतील, अशा भ्रमात भाजपाचे पदाधिकारी होते. परंतु उगले यांनी उमेदवारी अर्ज जैसे थे ठेवला. यामध्ये प्रभागात सर्वाधिक संख्याबळ असलेल्या शिवसेनेची सरशी झाली आणि भाजपाच्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला. ही माघार भाजपाच्या जिव्हारी लागली आहे. वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला असताना स्थानिक पातळीवरील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजकारण खेळत वरिष्ठांचे निर्णय धाब्यावर बसविल्याचा आरोप भाजपाकडून होत आहे.
याप्रकरणी भाजपाकडून महापौर राजेंद्र देवळेकरांना लक्ष केले जात आहे. देवळेकरांनी मात्र पक्षाचे जे काही निर्णय घ्यायचे असतात ते पदाधिकारी घेत असतात, असे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळयाला परवानगी मिळविण्यामध्ये मी व्यस्त होतो.
संबंधित प्रभागात आमचे संख्याबळ जास्त असून त्या निर्णयाबाबत मला काहीही माहिती नाही. यासंदर्भात योग्य माहिती पक्षाचे गटनेतेच देऊ शकतील, असे सांगत आपला याच्याशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

वरिष्ठांच्या आदेशाला स्थानिकांची तिलांजली

प्रभाग समित्या प्रत्येकी पाच वाटून घ्यायच्या ठरल्या होत्या. तसे आदेश वरिष्ठ नेत्यांकडून आले होते. परंतु शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाºयांनी त्याला तिलांजली दिल्याचे प्रभाग समितीच्या निवडणुकीत पाहावयास मिळाले. यामुळे भाजपामध्ये नाराजी आहे ही वस्तुस्थिती आहे.

महापौर राजेंद्र देवळेकरांनी काही लोकांना खुश करण्यासाठी आपल्या मर्जीप्रमाणे राजकारण केले आहे. आता येत्या महापौरपदाच्या निवडणुकीत आम्हाला सावध भूमिकेत राहणे गरजेचे आहे, असे मत भाजपाचे गटनेते वरूण पाटील यांनी ‘लोकमत’कडे मांडले.

‘वरिष्ठांच्या आदेशानुसार होणार कृती’
महापौरपदाची निवडणूक ठरल्याप्रमाणे होणार आहे. यंदाचे पद भाजपाच्या वाट्याला जाणार असले तरी आमच्या पक्षाच्या वरिष्ठांचे जे आदेश येतील, त्याप्रमाणे कृती होईल, असे मत महापौर राजेंद्र देवळेकर यांनी मांडले.

Web Title:  BJP shocked by the shock!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.