ठाण्यात घुमला घंटानाद; मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी भाजपाचं आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 03:39 PM2020-08-29T15:39:22+5:302020-08-29T15:42:32+5:30

भाजपा कार्यकर्त्यांचा शहरातील २८ मंदिरांबाहेर गजर

bjp stages protest at 28 places in thane city for reopening of temples | ठाण्यात घुमला घंटानाद; मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी भाजपाचं आंदोलन

ठाण्यात घुमला घंटानाद; मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी भाजपाचं आंदोलन

Next

ठाणे : राज्यातील मंदिरे, गुरुद्वारा, जैन मंदिरांसह धार्मिक संस्था उघडण्याच्या मागणीसाठी भाजपाच्या वतीने आज केलेल्या घंटानादाने ठाणे शहर दुमदुमले. ठाण्यातील प्रमुख देवस्थान कौपिनेश्वर मंदिर परिसराबरोबरच शहराच्या विविध भागातील २८ मंदिरांबाहेर भाजपा कार्यकर्ते, आध्यात्मिक आघाडीसह भाविकांनी `दार उघड उद्धवा दार उघड'च्या घोषणांचा गजर करीत घंटानाद केला.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील आंदोलनाचे नेतृत्व केले. कौपिनेश्वर मंदिराबाहेरील आंदोलनाला नगरसेवक संदीप लेले, सुनेश जोशी, नम्रता कोळी आदींचीही उपस्थिती होती.

केंद्र सरकारच्या निर्देशानंतरही, मंदिरे न उघडता भाविकांच्या भावनांशी खेळ केला जात आहे. संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रातील मंदिरे सरकारने आखून दिलेल्या नियमांत सुरू करण्याची आग्रही मागणी डावलली जात आहे. या मागणीबाबत ठाकरे सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे, अशी टीका आमदार निरंजन डावखरे यांनी केली.

महापालिकेतील गटनेते संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली गावदेवी माता मंदिरासमोर टाळ वाजवून घंटानाद केला. या वेळी प्रशांत कळंबटे, अमित पेडणेकर, विनय राऊत आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. हिरानंदानी इस्टेट येथील श्री सिद्धीविनायक मंदिराबाहेर नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेविका कमल चौधरी, सुरेश पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी घंटानाद केला. चंदनवाडी येथील सिद्धीविनायक मंदिर व राम मंदिराबाहेर झालेल्या आंदोलनात ज्येष्ठ नगरसेवक अशोक राऊळ, नारायण पवार, भाऊ दामले, संतोष साळुखे, किशोर गुणीजन, रुपेश कारंडे, भरत पडवळ, महेश विनेरकर आदींचा सहभाग होता. लोकपूरम मंदिराबाहेर नगरसेविका मुकेश मोकाशी, स्नेहा आंब्रे, रमेश आंब्रे, संतोष जैस्वाल यांनी आंदोलन केले. ठाणे शहरातील २८ ठिकाणी आंदोलने करण्यात आली. भाजपाच्या नौपाडा मंडल समितीत ५, मध्य मंडल व कळवा मंडल भागात प्रत्येकी ४, घोडबंदर रोड व दिवा भागात प्रत्येकी ३, लोकमान्य नगर, वर्तकनगर व रायलादेवी भागात २, मुंब्रा, कोपरी आणि वागळे इस्टेट भागात एका ठिकाणी टाळांच्या गजराबरोबरच घोषणांमध्ये घंटानाद करण्यात आला.

Web Title: bjp stages protest at 28 places in thane city for reopening of temples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.