राम मंदिरासाठी भाजपाचे शिवसेनेला समर्थन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 09:56 PM2018-11-14T21:56:43+5:302018-11-14T22:04:50+5:30

ठाणे आणि कल्याण हे भाजपचे बालेकिल्ले असून तिथे पुन्हा निवडणूक लढविण्यासाठी वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येईलच. राज्यातील अशा सर्वच मतदारसंघात निवडणूकीच्या दृष्टीने तयारीला लागा, केंद्र आणि राज्य सरकारची कामे लोकांपर्यत सोशल मिडियाच्या माध्यमातून पोहचवा, असा सल्लाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ठाण्यातील कार्यकर्त्यांना दिला.

BJP support Shiv Sena for Ram Mandir issue | राम मंदिरासाठी भाजपाचे शिवसेनेला समर्थन

रावसाहेब दानवेंचा दावा

Next
ठळक मुद्दे ठाणे-कल्याण भाजपाचा बालेकिल्लारावसाहेब दानवेंचा दावाठाण्यात घेतली निवडणूक आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे आणि कल्याण हे दोन मतदारसंघ म्हणजे भाजपाचे बालेकिल्ले आहेत. या मतदारसंघांत निवडणूक लढवण्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येईल. मुंबई-नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गाच्या नामकरणाचा निर्णय सरकारमधील दोन्ही पक्षांचे नेते एकत्रित बैठकीतून घेतील. त्यामुळे या मुद्यावरून दोन्ही पक्षांत तणावाची परिस्थिती निर्माण होणार नाही, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे-पाटील यांनी बुधवारी ठाण्यात केला.
ठाणे, भिवंडी आणि कल्याण या तीन लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी ते ठाण्यात आले होते. या आढावा बैठकीला मार्गदर्शन करण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील २८८ विधानसभा आणि ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी प्रत्येकी एक विस्तारक नेमला असून त्याच्यामार्फत कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचे काम सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर बैठका घेण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून ठाणे लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी आढावा बैठक घेतली.
राम मंदिराच्या मुद्यावर शिवसेनेला भाजपाचे समर्थन असून समविचारी पक्षांना एकत्र घेऊन आगामी निवडणूक लढवणार असल्याचे सांगून शिवसेनेशी राज्यात युती कायम ठेवणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा काढून राम मंदिराचा मुद्दा हाती घेतल्यामुळे आम्ही त्यांचे स्वागत करतो. यात कोणीही कोणाचा मुद्दा हायजॅक करू शकत नाही. प्रत्येकजण आपल्या पक्षाचे काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील ४८ पैकी १३ मतदारसंघांचा गेल्या १५ दिवसांमध्ये आढावा घेतला असून बुधवारी ठाण्यासह तीन ठिकाणचा दौरा करणार असल्याचे ते म्हणाले. भाजपा हादेखील स्वतंत्र राजकीय पक्ष असल्यामुळे राज्यभरात निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरूआहे. निवडणूक लढवताना नरेंद्र मोदींना पंतप्रधान करणे, हे मुख्य लक्ष्य असल्याचे ते म्हणाले. त्याचा मित्रपक्षाला (शिवसेनेलाही) फायदाच होईल. समविचारी पक्षांसोबत एकत्रपणे निवडणुकीला सामोरे जायचा भाजपाचा विचार आहे. विरोधी पक्षाला फायदा होऊ नये, हा त्यामागचा उद्देश आहे.
मुंबई-नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गाला पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी किंवा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यापैकी कोणाचे नाव द्यायचे, या वादावर दोन्ही पक्षांतील नेते चर्चेतून योग्य तो निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी राजीनामा देणार असल्याचे म्हटले आहे, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, ते म्हणाले, त्यांनी राजीनामा दिलेला नाही, देणार नाहीत. यात अंतिम निर्णय पार्लमेंटरी बोर्ड घेईल. गोटे यांच्याशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढला जाईल, असेही ते म्हणाले.

Web Title: BJP support Shiv Sena for Ram Mandir issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.