नरेंद्र पवार यांना भाजपचा पाठिंबा?, युतीमध्ये बेबनाव निर्माण होण्याची चिन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 05:35 AM2019-10-11T05:35:53+5:302019-10-11T05:35:56+5:30
एकाच जिल्ह्यातील दोन बंडखोरांबाबत हा दुजाभाव कशाकरिता, असा सवाल कल्याण पश्चिममधील शिवसैनिक करीत असून पवार यांच्या बंडाला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा छुपा पाठिंबा तर नाही ना, अशी शंका आता व्यक्त केली जात आहे.
ठाणे : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विश्वनाथ भोईर यांच्याविरोधात बंडखोरी करणारे भाजपचे विद्यमान आ. नरेंद्र पवार यांच्यावर पक्षाने हकालपट्टीची कारवाई केलेली नाही. मात्र, त्याचवेळी मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार विद्यमान आ. नरेंद्र मेहता यांच्याविरोधात बंडखोरी करणाऱ्या माजी महापौर गीता जैन यांची पक्षाने हकालपट्टी केली आहे. एकाच जिल्ह्यातील दोन बंडखोरांबाबत हा दुजाभाव कशाकरिता, असा सवाल कल्याण पश्चिममधील शिवसैनिक करीत असून पवार यांच्या बंडाला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा छुपा पाठिंबा तर नाही ना, अशी शंका आता व्यक्त केली जात आहे.
भाजपचे कार्यालयीन सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करून निवडणूक लढवणाºया चार जणांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यामध्ये चरण वाघमारे (तुमसर), गीता जैन (मीरा-भार्इंदर), बाळासाहेब ओव्हाळ (पिंपरी-चिंचवड) व दिलीप देशमुख (अहमदपूर, लातूर) यांचा समावेश आहे. जैन यांच्याप्रमाणेच पक्षादेश धाब्यावर बसवून पवार यांनी बंड केले. मात्र, त्यांच्यावर कारवाई झालेली नसल्याने शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
कल्याण पश्चिम मतदारसंघ भाजपने वाटाघाटीत शिवसेनेला सोडला. त्यामुळे पवार यांच्या राजकीय आशाआकांक्षांवर बोळा फिरला. त्यामुळे त्यांनी बंड केले. त्याचवेळी कल्याण पूर्व मतदारसंघाची मागणी तेथील शिवसैनिक करीत होते व ती मान्य न झाल्याने उल्हासनगर महापालिकेतील विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे यांनी बंड केले. या दोन्ही बंडांनी अगोदरच युतीमध्ये अविश्वास निर्माण झाला आहे. बोडारे यांनी माघार घेतली नाही म्हणून पवार यांनी माघार घेतली नाही, असे भाजपचे कार्यकर्ते खासगीत सांगत आहेत, तर पवार यांनी बंड केल्याने नाइलाजास्तव बोडारे यांनी अर्ज दाखल केल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. वाटाघाटीत एखादा मतदारसंघ सोडायचा व नंतर तेथे बंडखोराला अर्ज भरण्यास भाग पाडून ताटात वाढलेले हळूच काढून घ्यायचे, असा हा प्रकार असल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. कल्याण पूर्वेतील शिवसैनिक तर एवढे आक्रमक झाले आहेत की, त्यांनी नगरसेवकपदाचे राजीनामे दिले आहेत. पक्षावरील दबाव वाढवण्याकरिता ही खेळी असून या खेळीचा फरक पडणार नाही, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे मत आहे. अर्थात, भाजपच्या कार्यकर्त्यांना हे मान्य नाही. सेनेच्या वरिष्ठ नेत्यांचीच बोडारे यांच्या बंडाला फूस असल्याचे त्यांचे मत आहे.
विधानसभा निवडणूक असल्याने भाजप व शिवसेनेचे वरिष्ठ नेते महायुतीमध्ये ठाणे जिल्ह्यात सर्व आलबेल असल्याचे भासवत असले, तरी प्रत्यक्षात या दोन्ही मतदारसंघांतील बंडखोरीमुळे युतीच्या मधुर संबंधात मिठाचा खडा पडला आहे. दोन्ही किंवा एका मतदारसंघात जर बंडखोर विजयी झाला, तर भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक होण्याची व परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची दाट शक्यता दिसत आहे.
नरेंद्र पवार यांच्यावर कारवाई का झाली नाही, ते मला माहीत नाही. कल्याण पूर्व व पश्चिम या दोन्ही मतदारसंघांतील बंडखोरांना माघार घेण्यास दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाने सांगितले होते. आता या दोन्ही मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याबाबतचा संयुक्त निर्णय दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाकडून घेतला जाईल. त्यानंतर, पुढील निर्णय होतील.
- रवींद्र चव्हाण, राज्यमंत्री व भाजप नेते