उल्हासनगरात रुग्णवाहिकेचे भाजपाकडून प्रतीकात्मक उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2020 07:45 PM2020-09-26T19:45:21+5:302020-09-26T19:45:31+5:30
गेल्या महिन्यात महापालिकेला एकूण ९ रुग्णवाहिका पाठविल्याची माहिती वाहन विभागाचे अधिकारी यशवंत सगळे यांनी दिली.
उल्हासनगर : महापालिका प्रभाग समिती क्र. ३च्या कार्यालय प्रांगणात गेल्या महिन्यापासून धूळखात उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेचे भाजप नगरसेवकांनी प्रतीकात्मक उद्घाटन केले. राज्य शासनाने कोरोना रुग्णाच्या सेवेसाठी गेल्या महिन्यात महापालिकेला एकूण ९ रुग्णवाहिका पाठविल्याची माहिती वाहन विभागाचे अधिकारी यशवंत सगळे यांनी दिली.
उल्हासनगरात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ९ हजारांपेक्षा जास्त झाली असून, पाॅझिटिव्ह रुग्णाची संख्या ५०० पेक्षा जास्त आहे. रुग्णवाहिका शिवाय रुग्णांचे हाल होऊ नये म्हणून महापालिकेले भाड्याने रुग्णवाहिका घेतल्या आहेत. दरम्यान राज्य शासनाने महापालिकेला एकून ९ रुग्णवाहिका ऑगस्ट महिन्यात पाठविलेल्या असून रुग्णवाहिका महापालिका प्रभाग समिती क्र. -३ च्या कार्यालय प्रांगणात ठेवण्यात आल्या. शासनाने पाठविलेल्या रुग्णवाहिका गेल्या एका महिन्यापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती भाजपचे नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांना मिळाली. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांसह प्रभाग समिती कार्यालय गाठून धूळखात उभ्या असलेल्या रुग्णवाहिकाचे प्रतिकात्मक उद्घाटन केले.
महापालिकेने भाड्याने रुग्णवाहिका घेण्याऐवजी शासनाने पाठविलेल्या रुग्णवाहिकेचा उपयोग करावा. ज्यामुळे महापालिकेचे भाड्यापोटी देण्यात येत असलेल्या लाखो रुपयाची बचत होईल, असे प्रदीप रामचंदानी म्हणाले. महापालिका परिवहन विभागाचे प्रमुख यशवंत सगळे यांनी रुग्णवाहिकेसाठी चालक नसल्याने, रुग्णवाहिका उभ्या असल्याची प्रतिक्रिया दिली. कंत्राटी पद्धतीने चालक घेण्यात येत असून दोन दिवसांत सर्वच रुग्णवाहिका रस्त्यावर धावताना धावणार असल्याची प्रतिक्रिया दिली. एकूणच महापालिकेच्या सर्वच विभागात सावळागोंधळ निर्माण झाला आहे. धूळखात असलेल्या रुग्णवाहिका रुग्णाच्या सेवेसाठी उपलब्ध झाली नाहीतर, पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा भाजप नगरसेवक मनोज लासी यांनी दिला. आजही अनेक रुग्णांना वेळेत रुग्णवाहिका व उपचार मिळत नसल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षांनी दिली. तसेच सत्ताधारी शिवसेना यांचे कोरोना काळात काही अस्तित्व दिसत नसल्याचा आरोप नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी केला आहे.
रुग्णवाहिकाप्रकरणी मनसे आक्रमक
ऐन कोरोना महामारीत शासनाने पाठविलेल्या एकूण ९ रुग्णवाहिका गेल्या एका महिन्यापासून उद्घाटनाअभावी महापालिका प्रभाग समिती कार्यालय प्रांगणात धूळखात पडून आहेत. तर दुसरीकडे भाड्याने घेतलेल्या रुग्णालयाच्या भाड्यापोटी लाखो रुपये खर्च करीत आहेत. महापालिका आयुक्तांनी शासनाने पाठविलेल्या रुग्णवाहिका रुग्णासाठी त्वरित सुरू करा. नाहीतर मनसे आपल्या स्टाईल मध्ये आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिला आहे.