ठाण्याची दिल्लीत तुरी, महायुतीमध्ये भाऊगर्दी; लोकसभेचे तिकीट कोणाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 06:38 AM2024-03-02T06:38:11+5:302024-03-02T06:38:34+5:30

शिवसेनेचा ठाणे हा बालेकिल्ला असल्याने यावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने दावा कायम ठेवला आहे.

BJP talk on Thane in Delhi, brotherhood in Mahayuti; Lok Sabha ticket to whom? | ठाण्याची दिल्लीत तुरी, महायुतीमध्ये भाऊगर्दी; लोकसभेचे तिकीट कोणाला?

ठाण्याची दिल्लीत तुरी, महायुतीमध्ये भाऊगर्दी; लोकसभेचे तिकीट कोणाला?

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यावरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच या दोन्ही पक्षांमध्ये नवे नवे इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. दिल्लीत याबाबत निर्णय होणार आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीत तिन्ही पक्षांमधील इच्छुकांची संख्या अधिक असणार आहे. त्यावेळी आपली डाळ शिजणार नाही. त्यामुळे थेट लोकसभा निवडणुकीकरिता दावा करायचा व समजा यश मिळाले नाही तरी ज्या विधानसभा मतदारसंघात आपल्याला सर्वाधिक मते मिळतील त्यावर कालांतराने दावा करायचा, अशी रणनीती काहींनी आखली आहे. 

शिवसेनेचा ठाणे हा बालेकिल्ला असल्याने यावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने दावा कायम ठेवला आहे. ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे हेच पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असणार हे स्पष्ट आहे; परंतु भाजपला हा मतदारसंघ ताब्यात घ्यायचा आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे, तर भिवंडी व ठाणे हे दोन्ही मतदारसंघ भाजपकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपने ठाणे आणि कल्याणवर दावा केल्यानेच शिवसेनेने ठाणे, कल्याणसह भिवंडी आणि पालघर या मतदारसंघांवर दावा केला. दोन्ही पक्षांकडून मतदारसंघात आपली पाळेमुळे मजबूत करण्यासाठी काम केले जात आहे. 

भाजपमधून माजी खासदार संजीव नाईक व विनय सहस्रबुद्धे तसेच संजय केळकर यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू होती; परंतु आता या मतदारसंघात मुंबईतून उमेदवार आयात करण्याची रणनीती भाजपने आखल्याचीही चर्चा आहे. शिवसेनेत सुरुवातीला शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के, प्रताप सरनाईक यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू होती. आता त्यात ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या नावांची भर पडली. 

मैत्रीचे रूपांतर होणार काँटे की टक्करमध्ये
राजन विचारे यांचे रवींद्र फाटक हे जुने मित्र मानले जातात; परंतु अशी लढत झाल्यास मैत्रीचे रूपांतर आता ‘काँटे की टक्कर’मध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. फाटक यांच्या नावावरून विचारे यांनी त्यांची खिल्ली उडविली आहे.

Web Title: BJP talk on Thane in Delhi, brotherhood in Mahayuti; Lok Sabha ticket to whom?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.