ठाण्यात स्वबळासाठी भाजपची चाचपणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:17 AM2019-08-28T00:17:52+5:302019-08-28T00:17:56+5:30
इच्छुकांची गर्दी : सेनेच्या मतदारसंघात तयारी
ठाणे : एकीकडे शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपावरून कोल्डवॉर सुरू असताना दुसरीकडे भाजपने मात्र हे निमित्त पुढे करून स्वबळाची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असून यामध्ये अनेकांनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळे येत्या काळात युती झाली नाही तर आम्ही स्वबळावर लढण्यास सक्षम आहोत, असा इशारा भाजपने या निमित्ताने दिला आहे.
सोमवारी दुपार नंतर भाजपच्या ठाण्यातील खोपट येथील कार्यालयात कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. युतीतील अलिकडच्या घडामोडींवरुन जागा वाटपांबाबत रस्सीखेच दिसते. त्यातच भाजपने चारही मतदार संघासाठी मुलाखती घेऊन स्वबळाचा नारा मजबुत केल्याची चर्चा आहे.
ठाणे शहर मतदारसंघातून विद्यमान आमदार संजय केळकर, नारायण पवार, संदीप लेले, संजय वाघुले, डॉ. राजेश मढवी, मिलिंद पाटणकर, सुरेश कोलते यांनी मुलाखती दिल्या. ओवळा-माजिवडा मतदारसंघातून मनोहर डुंबरे, सीताराम राणे, अर्चना मणेरा, मुकेश मोकाशी, शेर बहादुर सिंग, शिवाजी पाटील यांनी तर कळवा मुंब्रा मतदारसंघातून हर्षला बुबेरा, रिदा राशीद, मनोहर सुखदरे यांनी तयारी दर्शविली. कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून भरत चव्हाण आणि समीरा भारती यांनी मुलाखती दिल्या.
लेले यांचे टोचले कान
एकीकडे स्वबळाची तयारी सुरू असतांना ठाण्यात मात्र, बुथ लेव्हलच्या पदाधिकाऱ्यांची अद्याप बांधणी झालेली नाही, पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही, संघटन बांधणी झालेली नसल्याच्या मुद्यावरून कामगार मंत्री कुटे यांनी शहर अध्यक्ष संदीप लेले यांचे चांगलेच कान टोचले.