मीरा भाईंदरमध्ये नरेंद्र मेहतांच्या वर्चस्वाला भाजपातूनच सुरुंग ? 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 03:09 PM2020-07-05T15:09:17+5:302020-07-05T15:11:51+5:30

मीरा भाईंदरच्या जिल्हाध्यक्षपदी पुन्हा हेमंत म्हात्रे यांची नियुक्ती

BJP trying to decrease former mla Narendra Mehtas dominance in Mira Bhayandar | मीरा भाईंदरमध्ये नरेंद्र मेहतांच्या वर्चस्वाला भाजपातूनच सुरुंग ? 

मीरा भाईंदरमध्ये नरेंद्र मेहतांच्या वर्चस्वाला भाजपातूनच सुरुंग ? 

Next

मीरारोड - मीरा भाईंदर भाजपाचे जिल्हाध्यक्ष पद माजी आमदार नरेंद्र मेहता अथवा त्यांच्या मर्जीतील समर्थकास मिळण्याच्या चर्चेला भाजपा पक्षश्रेष्ठींनी खोडुन काढत जिल्हाध्यक्षपदी पुन्हा हेमंत म्हात्रे यांची नियुक्ती केली आहे. तर म्हात्रेंनी, यापुढे पक्षाचे निष्ठावंत व पात्रता पाहुनच पदे दिली जातील असे स्पष्ट करत कोणाचा दबाव खपवून घेणार नाही असा इशारा दिला आहे. मेहतां विरोधात भाजपात असलेला असंतोष व त्यातुनच म्हात्रेंची नियुक्ती आणि त्यांनी दिलेला इशारा हा मेहतांबाबत असल्याचे मानले जाते. तर म्हात्रेंना शुभेच्छा देताना अनेकांनी मेहतांच्या फोटोला कात्री लावली आहे.

मीरा भाईंदर हा भाजपाच्या मोठ्या प्रमाणातील मतदारवर्गामुळे हमखास विजयाचा मतदारसंघ पक्ष स्तरावर मानला जात होता. परंतु 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या बंडखोर नगरसेविका गीता जैन यांनी सर्वपरीने बलाढ्य अशा तत्कालीन वादग्रस्त आमदार नरेंद्र मेहतांना पराभवाची धूळ चारली. भाजपाचा मतदार असुन देखील चुकीचा व लोकां मध्ये असंतोष असलेला उमेदवार दिल्याने भाजपावर पराभवाची नामुष्की ओढवली. मेहता हे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास जवळचे आमदार म्हणून ओळखले जात.

वास्तविक मीरा भाईंदर भाजपाची सर्व सुत्रे मेहतांच्या हातीच देण्यात आली होती. पण सुरवातीपासूनच ते सातत्याने विविध प्रकरणात वादग्रस्त राहिले. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल होत असताना गैरप्रकार, भ्रष्टाचाराच्या तक्रारी व आरोपसुद्धा वाढतच राहिले. भाजपा तर स्वत:ची खाजगी कंपनी म्हणुन वापरत असल्याचे आरोप भाजपातूनच झाले. मेहता व त्यांच्या 711 कंपनीने शहरात स्वत:चे झटपट मोठे साम्राज्य उभे केले. भाजपासह महापालिकेतदेखील त्यांच्या मर्जीनुसार कामकाज चालू लागले.

2015 साली जिल्हाध्यक्ष झालेले हेमंत म्हात्रे हे संघ व भाजपाचे जुने कार्यकर्ते असले तरी तेदेखील मेहतांच्या मर्जीबाहेर नव्हते. नव्हे मेहतांमुळे पद मिळाले असे मानले जात होते. मेहतांकडे असलेली आमदारकी, पालिकेत महापौर भावजय, प्रशासनावर पकड आणि थेट फडणवीस यांच्याशी असलेले घनिष्ठ संबंध यामुळे मेहतांविरोधात बोलण्यास कोणी नगरसेवक, पदाधिकारी धजावत नसे.

परंतु विधानसभा निवडणुकीत लोकांनी मेहतांना धोबीपछाड दिली आणि मेहतांच्या एकाधिकारशाहीला कंटाळलेल्या अनेक नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी मेहतांविरोधात उघडपणे भूमिका घेण्यास सुरवात केली. महापौर पदाच्या निवडणुकीत मेहता समर्थक रुपाली मोदींना बाजुला सारुन ज्योत्सना हसनाळे यांना महापौरपदी बसवत मेहता विरोधकांनी मोठा धक्का दिला. डिंपल मेहता नंतर पुढेदेखील महापौरांच्या दालनात बसून आपला मनमर्जीचा कारभार चालवण्याचे प्रयत्न होते.  

मेहतांचा अर्धनग्न अवस्थेतील वादग्रस्त व्हिडीओ सार्वजनिक झाल्यावर मेहतांनीच राजकारण व भाजपा सोडत असल्याचे जाहीर केले होते. भाजपा नगरसेविकेच्या फिर्यादी वरुन मेहतांवर बलात्कार, ऍट्रोसीटीचा गुन्हा दाखल झाला आहे.  ती नगरसेविका पहिली पत्नी असून तिचा मुलगा हा मेहतांचा असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यामुळे आधीच वादग्रस्त मेहतांवर भाजपा आणि राजकारण सोडण्याचे जाहीर करण्याची नामुष्की ओढवल्याचे मानले जाते. 

परंतु आजही मेहता पालिकेत येतात व महापौर दालनात बसुन महापौरांच्या आड बैठका घेतात. एकूणच या सर्व प्रकरणांमुळे भाजपातील अनेक नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी मेहतांच्या एकाधिकारशाही व कार्यपद्धती विरोधात उघड भूमिका घेतली आहे.

मेहता हे भाजपाचे जिल्हाध्यक्ष पद घेण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा होती. त्यांना पद नाकारल्यास त्यांचे कट्टर समर्थक नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांना सदर पदी बसवावे अशी शक्यतादेखील वर्तवली जात होती. परंतु मेहता विरोधातील नगरसेवकांनी पक्ष श्रेष्ठींकडे, भाजपाची होणारी बदनामी आणि स्वार्थासाठी केला जणारा पक्ष व पालिकेतील सत्तेचा गैरवापर आदी मुद्दे आग्रहाने मांडले. 

शहरात भाजपाला मानणारा मोठा मतदार असुनही विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव हा वादग्रस्त उमेदवारा मुळे झाल्याचे भाजपाच्या एका नगरसेवकाने सांगितले. पक्षश्रेष्ठींकडे देखील आम्ही परखडपणे सर्व परिस्थीती मांडली आहे. म्हात्रे यांच्या नियुक्तीबद्दल शुभेच्छा देणाऱ्या संदेशांमधूनदेखील मेहतांना बाहेर ठेवण्यात आले आहे. मेहतांचे छायाचित्रच अनेकांनी टाकलेले नाही.

हेमंत म्हात्रेंनी कोणाच्या दबावाखाली काम करणार नाही असे स्पष्ट करत मेहतांचा नामोल्लेख टाळत इशाराच दिला आहे. पदंसुद्धा पक्षनिष्ठा आणि योग्यता पाहून दिली जातील. 2022 साली होणाऱ्या पालिका निवडणुकीत पुन्हा भाजपाची सत्ता आणण्यासह पुढचा आमदारसुद्धा भाजपाचा असेल असे ते म्हणाले. तर याबाबत मेहता समर्थक ध्रुवकिशोर पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. 

Web Title: BJP trying to decrease former mla Narendra Mehtas dominance in Mira Bhayandar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.