जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भाजपाचा उपाध्यक्ष

By admin | Published: May 12, 2017 01:41 AM2017-05-12T01:41:40+5:302017-05-12T01:41:40+5:30

राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये सर्वात श्रीमंत असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेच्या

BJP vice president on district central bank | जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भाजपाचा उपाध्यक्ष

जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भाजपाचा उपाध्यक्ष

Next

सुरेश लोखंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये सर्वात श्रीमंत असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेच्या उपाध्यक्षपदी भाजपाच्या उमेदवाराची प्रथमच निवड होणार आहे. यासाठी १२ मे रोजी निवडणूक असून ती बिनविरोध करण्यासाठी वसईच्या बहुजन विकास आघाडी व भाजपा पक्षश्रेष्ठीचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
या बँकेवर राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाची दीर्घकाळ सत्ता होती. मात्र, कालौघात या दोन्ही पक्षांना या टीडीसीसी बँकेच्या सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे. सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या या बँकेवर बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली राजेंद्र पाटील अध्यक्ष आहे. या अध्यक्षपदासाठी पाठिंबा देऊन त्यांना सत्तेत आणणाऱ्या भाजपाला उपाध्यक्षपद देण्याच्या वाटाघाटी याआधीच झालेल्या आहेत. यामुळे उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होऊन भाजपाची पहिल्यांदाच बँकेच्या उपाध्यक्षपदी वर्णी लागणार आहे.
यामुळे सुमारे दोन वर्षे उपाध्यक्षपदी असलेल्या बहुजन विकास आघाडीच्या सुनीता दिनकर यांच्याऐवजी भाजपाच्या बँक संचालकास उमेदवारी देऊन त्याची बिनविरोध निवड करण्यासाठी भाजपाचे खासदार कपिल पाटील व हितेंद्र ठाकूर यांचे एकमत झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
या पक्षश्रेष्ठींकडून निवडणुकीच्या आधी निष्ठावंत कार्यकर्त्यांची उमेदवारी निश्चित केली जाणार आहे. तत्पूर्वी बँकेवर सुमारे २००२ पासून भाजपाचे एकमेव संचालक म्हणून निवडून येणारे भाऊ कुऱ्हाडे यांची बिनविरोध निवड करून त्यांची उपाध्यक्षपदी वर्णी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
बँकेवर सुमारे १५ वर्षांपासून निवडून येणारे कुऱ्हाडे भाजपाचे एकमेव संचालक आहेत. या निष्ठावंत संचालकास उपाध्यक्षपदाची संधी देणे क्रमप्राप्त ठरत असल्यामुळे त्यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींकडून शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे. बँक स्थापनेपासून प्रथमच बँकेच्या उपाध्यक्षपदी भाजपा उमेदवाराची पहिल्यांदा निवड करणारे समीकरण या निवडणुकीत जुळून आले आहे. बँकेच्या २१ संचालकांपैकी दोन संचालकांचे निधन झाले आहे. उर्वरित १९ संचालकांपैकी बँकेवर बहुजन विकास आघाडीचे १० संचालक आहेत.

Web Title: BJP vice president on district central bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.