बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये भाजपाचा 'ढणढणाट'; वाढदिवसाच्या कार्यक्रमात लावली वाट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 11:16 AM2018-11-01T11:16:13+5:302018-11-01T12:04:01+5:30

रेल्वे स्थानकाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात खासदार कपिल पाटील यांची उपस्थिती

BJP violate noise pollution limit in Badlapur Railway Station | बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये भाजपाचा 'ढणढणाट'; वाढदिवसाच्या कार्यक्रमात लावली वाट

बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये भाजपाचा 'ढणढणाट'; वाढदिवसाच्या कार्यक्रमात लावली वाट

Next

बदलापूर : बदलापूररेल्वे स्थानकाचा 162 वा वर्धापन दिन साजरा करताना ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवल्याची बाब समोर आली आहे. उत्साहाच्या नादात रेल्वे प्रवाशांना धोका निर्माण होईल अशी परिस्थिती बदलापूर रेल्वे स्थानकात निर्माण झाली होती.


  बदलापूर रेल्वे स्थानकाचा 162 वा वर्धापन दिन सकाळी नऊ वाजता साजरा करण्यात आला. यावेळी खासदार कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तब्बल दीड तास हा कार्यक्रम रेल्वे स्थानक परिसरात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमानंतर बदलापुरातील ढोल पथकाला पाचारण करण्यात आले होते. या ढोल पथकाने थेट फलाट क्रमांक 3 वरील तिकीट खिडकी समोरच आपल्या पथकाचे प्रदर्शन दाखविले. यावेळी आवाजाची मर्यादा पूर्णपणे ओलांडली गेली होती. सरासरी 50 ते 55 डेसिबल आवाजाची मर्यादा असताना ढोल पथकामुळे आवाजाची मर्यादा थेट 80 ते 85 डेसिबलपर्यंत गेली होती. ढोल पथक आवाज सुरू असतानाच फलाट क्रमांक तीन वरून डेक्कन एक्सप्रेस गाडी देखील गेली त्या गाडीचा आवाज स्थानकावर प्रवाशांना देखील ऐकू आला नाही. ढोल पथकाचा आवाज एवढा तीव्र होता की एक्सप्रेसचा हॉर्न ऐकू न आल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. उत्साहाच्या भरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात नियमांची पायमल्ली झालेली असताना देखील त्या संदर्भात रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे स्थानक प्रबंधक त्यांच्यामार्फत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. 


आवाजाची मर्यादा ओलांडल्या गेल्या आणि त्या संदर्भातील वृत्त पत्रकार घेत असल्याचे लक्षात येताच स्टेशन मास्तरांनी या ढोल पथकांना आवाज थांबविण्याचे आदेश दिले. पंधरा मिनिटे सुरू असलेल्या या धिंगाण्यात रेल्वे प्रशासन मात्र भाजपच्या कार्यक्रमापुढे झुकल्याचे चित्र निर्माण झाले होते.

  दरम्यान, या कार्यक्रमाच्या आयोजकांनी ढोल पथकाचा कार्यक्रम आपला नसल्याचे स्पष्ट करीत या प्रकरणातून अंग झटकण्याचा प्रयत्न केला आहे.


तर ढोल पथकावर गुन्हा दाखल होणार...
कार्यक्रमाचा एक भाग म्हणूनच ढोल पथक रेल्वे स्थानकात आलेले असताना देखील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला या प्रकरणातून वाचवण्यासाठी ढोल पथकाच्या कार्यकर्त्यांना पुढे केले आहे. त्यामुळे या ढोल पथकावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे ढोल पथकावर कारवाई करून खासदार पाटील यांना या प्रकरणातून दूर ठेवण्याचा प्रयत्न होत आहे.

Web Title: BJP violate noise pollution limit in Badlapur Railway Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.