उल्हासनगरात भाजप विरुद्ध शिवसेना सामना! महापालिकेतील टेंडरवार थांबवा; भाजपचे आयुक्तांकडे साकडे
By सदानंद नाईक | Published: January 23, 2024 07:47 PM2024-01-23T19:47:45+5:302024-01-23T19:48:30+5:30
महापालिका ठेकेदारातही दोन गट निर्माण झाल्याचे बोलले जात असून त्यांची भूमिका येत्या आठवड्यात स्पष्ट होणार आहे.
उल्हासनगर: ठेकेदारातील टेंडरवारवरून भाजपाने आक्रमक भूमिका घेऊन महापालिका आयुक्त अजीज शेख यांची भेट घेऊन पी अँड झा कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली. तसेच आमदार कुमार आयलानी यांच्यासह भाजपाच्या माजी २३ नगरसेवकांनी आयुक्तांना पत्र देऊन कारवाई करण्याची मागणी केली.
उल्हासनगर महापालिका विकास कामात १०० कोटीचा घोटाळ्याचा आरोप भाजपने पत्रकार परिषदेत करून, शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख अरुण अशान व पी अँड झा कंपनीला टार्गेट केले. त्यानंतर शिवसेना नेते अरुण अशान व पी अँड झा कंपनीचे प्रमुख प्रेम झा यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांच्यावर टीकास्त्र सोडले. याप्रकाराने भाजप व शिवसेना शिंदे गट या टेंडरवार वरून आमने-सामने आल्याचे चित्र शहरात निर्माण झाले.
भाजप शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांच्या नेतृत्वाखाली आमदार कुमार आयलानी, राकेश पाठक, लखी नाथानी, नरेश ठारवानी, शेरी लुंड, किशोर वनवारी, महेश सुखरामनी आदींच्या शिष्टमंडळाने मंगळवारी महापालिका आयुक्त अजीज शेख यांची भेट घेऊन पी अँड झा या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली. तसेच भाजपचे आमदार कुमार आयलानी यांच्यासह पक्षाचे माजी २२ नगरसेवकांनी पी अँड झा कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची लेखी मागणी महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्याकडे केली. शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी शिवसेना शिंदे गटाचे अरुण अशान व पी अँड झा कंपनीला टार्गेट केल्याने, महापालिकेतील सावळा-गोंधळाची चर्चा शहरात रंगली आहे. भाजपच्या आक्रमक भूमिकेनंतर पी अँड झा कंपनी व शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक नेते अरुण अशान हे काय भूमिका घेतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिका ठेकेदारातही दोन गट निर्माण झाल्याचे बोलले जात असून त्यांची भूमिका येत्या आठवड्यात स्पष्ट होणार आहे.
भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज भेट घेतली असून शिष्टमंडळात आमदार कुमार आयलानी उपस्थित होते. महापालिकेचे विकास कामे घेतांना पी अँड झा कंपनीने सादर केलेले कागदपत्र बोगस असल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला असून कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली. याबाबत सविस्तर चौकशी करून दोषी असल्यास कारवाई केली जाणार आहे. अजीज शेख, आयुक्त-उल्हासनगर महापालिका.