केडीएमसीत रंगणार शिवसेना विरुद्ध भाजप सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 12:31 AM2020-01-02T00:31:06+5:302020-01-02T00:31:22+5:30
स्थायी समितीत सभापतीपद निवडणूक; शिवसेनेकडून कोट, भाजपकडून म्हात्रेंचा अर्ज, बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न फसले
कल्याण : राज्यात शिवसेना-भाजप युती तुटल्याचे पडसाद कल्याण-डोंबिवली महापालिकेतील स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत उमटले आहेत. सभापतीपदासाठी बुधवारी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेतर्फे गणेश कोट यांनी तर, भाजपतर्फे विकास म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज भरले. त्यामुळे शुक्रवारी होणारी ही निवडणूक बिनविरोध करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न फसला आहे. मात्र, आमचे संख्याबळ जास्त असल्याने आमचाच सभापती होणार, असा दावा शिवसेनेने केला आहे.
स्थायी समितीत १६ पैकी आठ सदस्य हे शिवसेनेचे आहेत. भाजपचे सहा सदस्य, तर राष्ट्रवादी व मनसेचा प्रत्येकी एक सदस्य आहे. शिवसेनेकडे विजयासाठी पुरेसे संख्याबळ आहे. मात्र, भाजपकडे सहा सदस्य असल्याने त्यांना राष्ट्रवादी व मनसेची मदत घ्यावी लागेल. मात्र, राज्याच्या सत्ता स्थापनेत महाविकास आघाडीत मनसे तटस्थ राहिली. तर, राष्ट्रवादी व शिवसेना सत्तेत एकत्रित आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरही राष्ट्रवादीची साथ शिवसेनेला मिळणार हे स्पष्ट आहे. तरीही, भाजपचे उमेदवार म्हात्रे यांनी आपल्याला राष्ट्रवादी व मनसेची साथ मिळणार असल्याचा दावा केला आहे. मनसे व राष्ट्रवादीने भाजपला साथ देण्याचे ठरविले तरी, शिवसेना व भाजप यांच्या उमेदवारांचे संख्याबळ हे समसमान होते. त्यामुळे चिठ्ठी टाकून सभापतींची निवड करण्याची वेळ येऊ शकते. सभापतीपदासाठी म्हात्रे हे प्रबळ दावेदार आहेत. सभापतीपदासाठी भाजपकडून घोडेबाजारही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हात्रे हे स्वत: आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. त्यामुळे सदस्य फोडण्याचे राजकारण भाजपकडून केले जाण्याची शक्यता आहे.
२०१५ मध्ये महापालिकेत सत्ता स्थापन करताना शिवसेना-भाजपमध्ये झालेल्या बोलणीनुसार महापौरपद प्रत्येकी दोन वर्षे शिवसेनेच्या सदस्याला तर, त्यानंतर शेवटचे वर्ष भाजपच्या सदस्याला दिले जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, राज्यात युती तुटल्याने स्थानिक पातळीवर महापौरपद भाजपला देण्यात आलेले नाही. त्यामुळे आता ‘स्टॅण्डिंग’साठी ‘राजकीय अंडरस्टॅण्डिंग’ न करण्याचे म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे.
मागच्या वेळेत स्थायी समिती सभापतीपदासाठी शिवसेनेचे गणेश कोट व जयवंत भोईर हे इच्छुक होते. मात्र, पक्षाने दीपेश म्हात्रे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने कोट व भोईर यांनी त्यांच्या स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे पक्षाच्या ठाणे जिल्हा नेतृत्वाने कोट व भोईर यांची समजूत काढून त्यांना पुन्हा स्थायी समिती सदस्यपदी निवडले होते. दीपेश यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने शुक्रवारी सभापतीपदाची निवडणूक होणार आहे. कोट यांना शब्द दिला असल्याने व शिवसेनेतून अन्य कोणी दावेदार नसल्याने कोट यांच्या नावाचा खलिता पक्षाकडून महापालिकेत बुधवारी दुपारी आला. त्यानुसार, शिवसेनेतर्फे कोट यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
शिवसेनेला पाठिंबा देणारे अपक्ष नगरसेवक कासीब तानकी यांना यापूर्वी स्थायी समितीचे सदस्यत्व दिले होते. त्यानंतर, पुन्हा त्यांना शिवसेनेने सदस्यपदाची संधी दिली आहे. सभापतीपदासाठी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, कोट यांना पक्षाने शब्द दिला असल्याने तानकी यांच्या मागणीचा विचार झालेला नाही.
तानकी यांनी उपमहापौरपदासाठीही मागच्या वेळी उमेदवारी भरला होता. शिवसेनेने समजूत काढल्यावर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. सभापतीपदाची निवडणूक शुक्रवारी दुपारी १२ वाजता पालघरचे जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
‘महिला-बालकल्याण’साठी एकमेव अर्ज
महिला-बालकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी शिवसेनेच्या नगरसेविका वीणा जाधव यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड होणार आहे.
महिला बालकल्याण समितीमध्ये शिवसेनेचे पाच, भाजपचे चार, काँग्रेस एक आणि मनसे एक असे संख्याबळ आहे.
भाजपने या समितीवर दावा सांगितलेला नाही. यापूर्वी भाजप नगरसेविका रेखा चौधरी या समितीच्या सभापती होत्या.
स्थायी समिती ही महापालिकेच्या अर्थकारणाची तिजोरी असल्याने शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपतर्फे म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.