कल्याण पश्चिमेतून लढण्यावर भाजप ठाम, शिवसेनेला जागा सुटण्याची शक्यता कमीच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 12:21 AM2019-09-29T00:21:53+5:302019-09-29T00:21:59+5:30
कल्याण पश्चिम मतदारसंघ युतीत शिवसेनेला घेण्याची मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असली तरी येथे विद्यमान आमदार असल्याने फॉर्म्युल्याप्रमाणे या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्यावर भाजप ठाम असल्याची माहिती प्रदेश पातळीवरील सूत्रांनी दिली आहे.
मुंबई : कल्याण पश्चिम मतदारसंघ युतीत शिवसेनेला घेण्याची मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असली तरी येथे विद्यमान आमदार असल्याने फॉर्म्युल्याप्रमाणे या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्यावर भाजप ठाम असल्याची माहिती प्रदेश पातळीवरील सूत्रांनी दिली आहे.
२०१४ मध्ये शिवसेना व भाजपने स्वतंत्र निवडणूक लढविल्यानंतर पवार यांच्या रूपाने भाजपने या मतदारसंघातून विजय मिळविला. त्यानंतर महापालिका निवडणुकीतही भाजपची ताकद वाढली. लोकसभा निवडणुकीतही कल्याण पश्चिममधून भाजपला चांगली मते मिळाली. त्यातून पवार यांना पक्षाने प्रदेशपातळीवर सचिव म्हणून जबाबदारी दिली. विधानसभा निवडणुकीतही हा मतदारसंघ भाजपला अनुकूल असल्याचे पक्षाच्या सर्वेक्षणात आढळले असल्याचे प्रदेश पातळीवरील सूत्रांनी सांगितले. मात्र, युती झाल्यास या मतदारसंघात विजय सोपा असल्याने पक्षात यंदा इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यातूनच पवार यांच्याऐवजी दुसरा उमेदवार द्यावा, यासाठी काहींनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मुंबईत भेट घेतली. मात्र भाजपमध्ये काही वर्षांत राष्ट्रवादी, काँग्रेस व मनसेतून आलेल्यांनी काहींच्या आशीर्वादातून पाटील यांची भेट घेतली, त्याला पक्ष पातळीवर महत्त्व मिळणार नसल्याचा संघाचे जुने कार्यकर्ते व भाजपच्या पदाधिकाऱ्यांना विश्वास आहे.
शिष्टमंडळातील नगरसेविका वैशाली पाटील या राष्ट्रवादीतून, नगरसेवक वरुण पाटील, रवी गायकर व साधना गायकर मनसेतून तर अर्जुन भोईर काँग्रेसममधून महापालिका निवडणुकीवेळी भाजपमध्ये आले आहेत. नगरसेवक संदीप गायकर यांनी तर पक्षाने दिलेली शहराध्यक्षपद मधेच सोडून दिले. त्यामुळे त्यांचा भाजपच्या वाढीत काय योगदान आहे, असाही सवाल केला जात आहे.
मुख्यमंत्री, प्रदेशाध्यांनी केले कौतुक, संघ-भाजपचे कार्यकर्ते पाठिशी
पवार हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सहा वर्ष प्रचारक होते. त्यांनी महाराष्ट्रात काम पाहिले आहे. प्रदेश मंत्री म्हणूनही त्यांनी अनेक आंदोलने केली आहेत. नगरसेवक ते उपमहापौर अशीही जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे.
मराठवाड्यात त्यांनी पक्षाच्या दुष्काळी कामासह जलयुक्त शिवारच्या कामातही सहभाग नोंदविला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनीही पवार यांचे जाहीरपणे कौतुक केले होते.
संघ व भाजपचे स्थानिक कार्यकर्ते त्यांच्या पाठिशी आहेत. ही त्यांच्या जमेची बाजू आहे. कल्याण शहराची सामाजिक रचना लक्षात घेता ते पक्षात पवार हेच भाजपचे सर्वसंमतीचे उमेदवार असल्याचे ज्येष्ठ कार्यकर्त्यांचेही म्हणणे आहे.